मोबाईल चोरी झाल्याचा फटका तुमच्यापैकी अनेकांना बसला असेल. सार्वजनिक ठिकाणी फोन हिसकावून चोरीला गेल्याच्या अनेक बातम्या येत असतात. पण, नोएडातील एका ट्विटर युजरने अलिकडेच त्याच्यासोबत घडलेल्या मोबाईल चोरीच्या अत्यंत विचित्र घटनेचा अनुभव सांगितला. चोराने त्याचा फोन चोरला पण त्याला तो फोन आवडला नाही म्हणून त्याने चक्क तो फोन मालकाला परत दिला. पण, फोन परत करताना त्याने मालकाला जे कारण सांगितलं ते तर अजून विचित्र होतं.

देबयान रॉयने ही घटना सांगितली. सेक्टर 52 नोएडा मेट्रो स्टेशनजवळ देबयान मोबाईल हातात पकडून चॅटिंग करत होता. पण, त्याचवेळी काळा मास्क घातलेल्या एका व्यक्तीने त्याचा फोन हिसकावून पळ काढला. फोन चोरल्याचं लक्षात येताच देबयान यांनी चोराला पकडण्यासाठी धाव घेतली. पण, त्यानंतर जे झालं ते खूपच हैराण करणारं होतं.

कारण, पळून जाणारा चोर चक्क परत फिरला आणि त्याने देबयानकडे “भाई, मुझे लगा OnePlus 9 Pro मॉडेल है” असं सांगितलं. इतकंच नाही तर फोन तिथेच रस्त्यावर फेकून तो पुन्हा पळून गेला.

ही घटना देबयानने ट्विटरद्वारे शेअर केल्यानंतर अनेकांनी देबयानला तू नक्की असा कोणता फोन वापरत होतास जो चोराने फेकून दिला असा प्रश्न विचारला. त्यावर देबयानने आपल्याकडे Samsung Galaxy S10 Plus असल्याचं सांगितलं.

नंतर अनेक नेटकऱ्यांनी Samsung Galaxy S10 Plus ची खिल्ली उडवण्यास सुरूवात केली. तर, अनेकजण चोराचंही ‘वेगळं स्टँडर्ड’ असतं अशाप्रकारच्या मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.