जगभरात नववर्षाचे जल्लोषात स्वागत होत असतानाच लोकप्रिय मेसेजिंग सर्व्हिस अॅप अर्थात व्हॉट्स अॅपची सेवा नववर्षाच्या मुहूर्तावर सुमारे ३० मिनिटांसाठी बंद पडली. व्हॉट्स अॅपची सेवा पूर्ववत झाल्याचे ‘व्हॉट्स अॅप’च्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले असले तरी नववर्षाच्या रात्रीच व्हॉट्स अॅपचे ‘बारा’ वाजल्याने युजर्सचा हिरमोड झाला होता.

रविवारी मध्यरात्री बारा वाजता नववर्षाचे स्वागत केल्यानंतर नेटिझन्सनी मोबाईल हातात घेतला आणि व्हॉट्स अॅपवरुन मित्रमंडळी व नातेवाईकांना नववर्षाचे मेसेज पाठवायला सुरुवात केली. मेसेज जात नसल्याने सुरुवातीला अनेकांनी नेट जोडणी तपासली. नववर्षाच्या मुहूर्तावर इंटरनेटवरील भार वाढला असावा आणि त्यामुळे व्हॉट्स अॅप बंद पडले असावे, असा सर्वांचा समज झाला. मात्र, काही वेळातच अनेकांनी सोशल मीडियावरही याबाबत विचारणा केली आणि ट्विटरवर ‘व्हॉट्सअॅपडाऊन’ हा हॅशटॅग ट्रेंड झाला. यानंतर जगभरात व्हॉट्स अॅप बंद पडल्याचे स्पष्ट झाले. अनेक युजर्सनी सुरुवातीला राग व्यक्त केला. मात्र, काही वेळातच याबाबतचे विनोदही व्हायरल होऊ लागले. भारतात व्हॉट्स अॅपचे २० कोटींपेक्षा जास्त युजर्स आहेत.