मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जनादेश यात्रेचा काल नाशिकमधील भव्य सभेत समारोप झाला. या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते. मोदींबरोबरच मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपाच्या इतर नेत्यांनाही या सभेत भाषणं केली. तपोवनातील साधुग्राम मैदानात झालेल्या या सभेला पंतप्रधान येणार असल्याने छावणीचेच स्वरुप आले होते. मात्र या सर्वांमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेला मुद्दा म्हणजे या सभेत कांदा तसेच अन्य शेतमाल घेऊन जाण्यावर बंदी घालण्यात आली होती. कांद्याच्या कोंडीने शेतकरी वर्गात संताप खदखदत असून त्याचा भडका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत उडू नये आणि कांदा हे निषेधाचे हत्यार ठरू नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली होती. मात्र याच मोदींच्या सभेच्या ठिकाणी केलेल्या कांदाबंदीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाल्याचे पहायला मिळाले. या व्हिडिओमध्ये राज यांनी दिलेल्या सल्ल्यांच्या पार्श्वभूमीवरच मोदींच्या सभेच्या ठिकाणी कांदाबंदी केल्याचा दावा अनेक मनसे कार्यकर्ते सोशल नेटवर्किंगवर करत होते.

या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये राज ठाकरे हे त्यांना भेटायला आलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्याला भाव मिळत नसल्यास तोच कांदा नेत्यांना फेकून मारा असा सल्ला देताना दिसत आहेत. या व्हिडिओत राज ठाकरेंनी शेतकऱ्यांना ‘कांदा रस्त्यावर फेकायचा नाही. तुम्ही तो पिकवला आहे ना. त्याला भाव मिळत नाहीय ना. मग तो कोणामुळे मिळत नाही? तर सत्ताधाऱ्यांमुळे. त्यामुळे जे जे मंत्री येतील ना त्यांना तो कांदा फेकून मारा. हा विनोद नाही. नेते बेशुद्ध होईपर्यंत कांदा मारा. बेशुद्ध पडले ना तर तोच कांदा फोडो. नाकाला लावा. शुद्धीवर आल्यावर परत मारा,’ असा सल्ला या व्हिडिओत दिला आहे. अनेक पेजेसवरुन हा व्हिडिओ काल शेअऱ करण्यात आला.

दरम्यान, कांद्याबाबत केंद्राने स्वीकारलेले धोरण, शेतकरी आत्महत्या आदी मुद्दय़ांवरून या सभेपूर्वी रस्त्यावर उतरण्याचा इशारा परिवर्तनवादी युवा संघटनांनी दिला होता. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा दौरा असल्याने पोलिसांनी आंदोलन करू पाहणाऱ्यांची धरपकड केली होती. सहा वर्षांपूर्वी मोदी यांची तपोवन येथे सभा झाली होती. त्यावेळी कांदा प्रश्नावर आवाज उठविणाऱ्या ‘स्वाभिमानी’च्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना सभेच्या एक दिवस आधीच ताब्यात घेण्यात आले होते. मनसेच्या कार्यकर्त्यांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या.

काही वर्षांपूर्वी तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या ग्रामीण भागांतील एका सभेत ‘कांदा फेक’ आंदोलन झाले होते. महाजनादेश यात्रेच्या समारोपावेळी कांद्याचा विषय ऐरणीवर आल्याने जाहीर सभेत कोणतेही आंदोलन होऊ नये, याची दक्षता प्रशासन आणि पोलिसांनी घेतली होती.