लाहोरजवळ वाघा- अटारी सीमेवर सर्वात मोठा झेंडा फडकावल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. या ध्वजाची उंची ४०० फूट असून पाकिस्तानी सेनाप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी मध्यरात्री १२ वाजता सीमेवर ध्वज फडकावला.

पाकिस्तानमध्ये सोमवारी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य दिनानिमित्त लाहोरजवळील वाघा- अटारी सीमेवर मोठा पाकिस्तानी ध्वज फडकावण्यात आला. या ध्वजाची उंची ४०० फूट असून लांबी १२० फूट तर रुंदी ८० फूट आहे. याविषयी जनरल बाजवा म्हणाले, ७७ वर्षांपूर्वी लाहोरमध्येच वेगळ्या पाकिस्तानचा प्रस्ताव झाला होता. रमजानमधील २७ व्या रात्री पाकिस्तान स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आला, त्यामुळे हा दिवस अतिशय शुभदिवस होता. आज आमचा देश संविधानाच्या मार्गावरुन पुढे जात आहे. आता सर्व संस्थानांमध्ये चांगल्या पद्धतीने काम होत आहे. देश स्वतंत्र होण्यासाठी अनेकांनी बलिदान दिले असून या शहिदांना आम्ही विसरु शकत नाही असे त्यांनी सांगितले.

बाजवा पुढे म्हणाले, आम्ही पाकिस्तानात प्रत्येक दहशतवाद्याचा खात्मा करु. आम्ही आमच्या शत्रूंना सांगू इच्छितो की तुमच्या बंदूकीतील गोळ्या संपतील पण आमचे जवान कायम आपल्या कार्यासाठी तत्पर असतील असे त्यांनी म्हटले आहे.