पावसाळ्याची सुरुवात म्हणजे आकाशात विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट! दरवर्षी वीज पडून अनेकांना आपले जीव गमवावे लागतात. अनेकांच्या संपत्तीचे नुकसान होते. आकाशात चमकणारी वीज मोजता येत नाही, परंतु ती लाखो मेगावॅटची असावी असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. आपल्यापैकी अनेकजण विजांचा कडकडाट झाला की खिडकीमध्ये बसून वीज बघण्याचा आणि कधीतरी ती कॅमेरात कैद करण्याचा किंवा स्लो मोशन व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करतात. मात्र अमेरिकेमधील अशाच एका फोटोग्राफरने क्लिक केलेला एक फोटो चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. कारण या फोटोमध्ये फोटोग्राफरने वीज पडण्याचा क्षण कॅमेरात तर कैद केलाच आहे मात्र त्याचबरोबर या विजेचा आकार फोटोमध्ये दिसणाऱ्या झाडांच्या आकाराशी साधर्म्य साधणारी आहे.

नक्की वाचा >> वीज कशी तयार होते? आणि वीज पडल्यास काय करावे?

हा मूळ फोटो ट्विटवर केली रुसेल अॅलन या फोटोग्राफरने शेअर केला आहे. स्ट्रोम चेसर म्हणजेच संशोधनाच्या हेतूने वादळांचा पाठ लाग करण्याचे आणि ती समजून घेण्याचे काम करणाऱ्या केलीने हा फोटो शेअर करताना “जेव्हा वीज झाडाचा आकार घेते,” अशी कॅप्शन दिली आहे.

अमेरिकेतील लोकप्रिय हवामानतज्ज्ञ निक क्रेयानॉक यांनीह त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरुन हा फोटो शेअर केला आहे. “हे झाड नाहीय. हा लूबॉक येथे एका छायाचित्रकाराने काढलेला विजेचा सुंदर फोटो आहे,” असं निक यांनी या फोटोला कॅप्शन देताना म्हटलं आहे. लूबबॉक हे टेक्सासमधील एक छोटं शहर असून फोटोग्राफर केली याच शहरामध्ये राहतो. निक यांनी फोटो शेअर केल्यानंतर तो अधिक व्हायरल झाला आहे.

अडीच हजारहून अधिक लोकांनी हा फोटो फेसबुकवर शेअर केला आहे. तर फेसबुक आणि ट्विटवर शेकडो लोकांनी या फोटोवर कमेंट करत असा फोटो काढणं हे फोटोग्राफरचं स्वप्न असतं असं म्हटलं आहे.