सेल्फी काढण्याचे सर्वांनाच प्रचंड वेड लागलेले असताना ‘कॅन्डीकॅम’ आणि ‘यु कॅम’ मध्ये आता आणखीन एका नव्या अॅपची भर पडली आहे. गेले काही दिवस विविध सोशल नेटवर्किंग साइट्सवर ‘प्रिस्मा’ नावाचा उल्लेख असणारे अनेक फोटो पोस्ट करत हा जणू एक ट्रेंडच बनला आहे. ‘प्रिस्मा’चे फोटो पोस्ट करण्यावरुन अनेकांनी त्यावर विनोदही केले, कारण हे बहुचर्चित अॅप फक्त ‘आयओएस’ कार्यप्रणालीवर चालणाऱ्या मोबाइवरच चालू शकत होते. पण या अॅपची वाढती लोकप्रियता पाहता अॅन्ड्रॉइड कार्यप्रणालीवर चालणाऱ्या स्मार्टफोनच्या अॅप्समध्येही या अॅपचा समावेश झाला आहे.
अवघ्या एकाच महिन्यामध्ये ‘प्रिस्मा’ अॅप स्मार्टफोनधारकांमध्ये बरेच गाजत आहे. या अॅपद्वारे ‘वॅन गो’, ‘पिकास्सो’, ‘लेवितान’ सारख्या स्टाइल्सची जोड देत तुम्ही तुमच्या फोटोला आणखीन कलात्मक बनवू शकता, असे ‘प्रिस्मा’च्या निर्मात्यांचे म्हणणे आहे. वापरण्यास अतिशय सोपा असलेल्या या अॅपमध्ये ‘इम्प्रेशन’, ‘कर्टन’, ‘रनिंग इन द स्टॉर्म’, ‘मॉन्ड्रेन’ यांसारखे ‘फिल्टर्स’ उपलब्ध करुन देण्यात आले असून हवा तो फिल्टर तुम्ही निवडू शकता. ‘प्रिस्मा’तून तुम्ही कोणताही फोटो थेट ‘फेसबुक’ आणि ‘इन्स्टाग्राम’ या सोशल नेटवर्किंग साइट्सवर पोस्ट करु शकता. तुमच्या साध्यासुध्या सेल्फीला एक कलात्मक साज चढवण्यासाठी हे अॅप अनेकांच्या पसंतीस उतरत आहे. या अॅपमध्ये काही दिवसांपूर्वीच भारतातल्या काही ऐतिहासिक स्थळांना ‘प्रिस्मा’चे रंग देत फोटोतील त्यांचे सौंदर्य आणखीनच उठावदार बनवले आहे. सोशल वर्तुळात सतत सक्रिय असणाऱ्या नेटिझन्समध्ये या अॅपची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत असतानाच अॅन्ड्रॉइडवरही आता ‘प्रिस्मा’ ची कलाकारी पाहायला मिळणार आहे.