ऑस्ट्रलियाच्या ‘क्वांटास एअरलाईन्स’ने सुरु केलेल्या फ्लाइट टू नोव्हेअर म्हणजेच कुठेही न जाणाऱ्या विमानाची तिकीटं अवघ्या १० मिनिटांमध्ये संपली. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ‘कुठेच न जाणारं विमान’ म्हणजे काय? तर करोनामुळे अनेक महिने विमान प्रवासावरील बंदी नंतर हळूहळू देशांतर्गत विमानप्रवासाला परवानगी देण्यात आल्यानंतर क्वांटासने विशेष विमानाची सोय प्रवाशांसाठी उपलब्ध करुन दिली आहे. या विमानाच्या नावाप्रमाणेच ते कुठेही जाणार नाहीत. म्हणजे जाणार पण ज्या विमानतळावरुन उड्डाण घेईल तिथेच हे विमान पुन्हा उतरणार. त्यामुळेच या विशेष सुविधेला ‘फ्लाइट टू नोव्हेअर’ असं नाव देण्यात आलं आहे.

‘द इंडिपेन्डट’ने दिलेल्या वृत्तानुसार ‘फ्लाइट टू नोव्हेअर’ची विमान ही सात तास उड्डाण करुन पुन्हा टेक ऑफ घेतलेल्या विमानतळावरच उतरतील. या तास तासांच्या प्रवासादरम्यान विमान देशातील सर्वात सुंदर ठिकाणांवरुन जाईल. ही विमानं सिडनी विमानतळावरुन उड्डाण घेणार आहेत. १० ऑक्टोबर रोजी हे पहिले विमान उड्डाण घेणार आहे. या उड्डाणादरम्यान विमान युरु, द ग्रेट बॅरियर रिफ आणि ऑस्ट्रेलियातील इतर प्रमुख पर्यटनस्थळांवरुन प्रवास करणार आहे. या विमानामध्ये एकूण १३४ सीट आहेत. बोईंग ७८७ शैलीच्या या विमानातील तिकीटांचे दर ५७५ डॉलर (अंदाजे ४२ हजार रुपये) ते दो हजार ७६५ डॉलर (अंदाजे २ लाख) दरम्यान ठेवण्यात आले होते. मात्र अवघ्या १० मिनिटांमध्ये फ्लाइट हाऊसफूल झालं. “आमच्या कंपनीच्या इतिहासात सर्वाधिक वेगाने विक्री झालेलं हे उड्डाण ठरलं आहे,” असं कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं.

या उड्डाणाला मिळालेल्या प्रतिसादावरुन लोकांना प्रवासाची आणि त्यातही विमानतप्रवासाची खूप आठवण येत असल्याचे स्पष्ट होतं आहे. असाच प्रतिसाद मिळत राहिला तर आम्ही भविष्यात अशाप्रकारची काही आणखीन उड्डाणांचा नक्कीच विचार करु. सध्या आम्ही आंतरराष्ट्रीय निर्बंध उठवण्याची वाट पाहत आहोत, असंही कंपनीचे प्रवक्ते म्हणाले. सिडनीबरोबरच कंपनीने अंटार्टीकालाही ‘जॉय राईड’ प्रकारचे विशेष उड्डाण आयोजित केलं आहे. युके आणि ऑस्ट्रेलियादरम्यान न थांबता सल १३ तास उड्डाण करणाऱ्या विमानांच्या मदतीने मेलबर्नवरुन ही विशेष सहलीसारखी उड्डाणे ठेवण्यात आलेली आहे.

या उड्डाणांना चांगला प्रतिसाद मिळत असतानाच पर्यावरण प्रेमींनी याला विरोध केला आहे. आता कुठे वातावरण जरा स्वच्छ झालेलं असतानाच अशापद्धीतने इंधन वाया घालवणं योग्य नसल्याचे मत पर्यावरण प्रेमींनी मांडलं आहे.