राजस्थानमध्ये एका मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमामध्ये पायाभरणीच्या वेळी हजारो लिटर दूध वापरण्यात आल्याचे वृत्त समोर आलं आहे. मंदिराच्या पायाचं बांधकाम करण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्याच्या आजूबाजूला उभं राहून शेकडो  भक्तांनी या खड्ड्यांमध्ये दुधाच्या मोठ्या आकाराच्या कीटल्या, दही आणि देशी तूप ओतलं. देवनारायण मंदिराच्या भूमिपूजनाच्या सोहळ्यामध्ये जलवार जिल्ह्यातील रतलाइमध्ये हा सर्व प्रकार घडल्याचे वृत्त हिंदुस्तान टाइम्सनं दिलं आहे. या अभिषेकासाठी ११ हजार लिटर दूध, दही, तूप वापरण्यात आल्याचे समजते.

“आम्ही देवनारायण मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी गुज्जर समाजातील भक्तांबरोबरच इतर समाजातील लोकांकडून तब्बल ११ हजार लिटर दूध, देशी तूप, दही गोळा केलं आणि त्याचा या कार्यक्रमासाठी वापर केला,” अशी माहिती या मंदिराच्या बांधकाम समितीचे प्रवक्ते रामलाल गुज्जर यांनी दिली.

गोळा करण्यात आलेल्या गोष्टींमधील ११ हजार लिटरपैकी १५०० लिटर दही, एक क्विंटल देशी तूप आणि बाकी दूध होतं. या सर्वाची एकूण किंमत दीड लाख रुपये इतकी होती. आम्ही या कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी गुज्जर समाजाकडे दुग्धजन्य पदार्थ दान करण्यासंदर्भात आवाहन केलं होतं. त्यानंतर लोकांनी हे पदार्थ दान केले होते, असंही रामलाल म्हणाले. अशाप्रकारे एवढ्या मोठ्या प्रमाणात दुधापासून बनवलेले पदार्थ वापरणे ही बंधनकारक प्रथा आहे का यासंदर्भात विचारणा करण्यात आली असता रामलाल यांनी नाही असं उत्तर दिलं. ही प्रथा बंधनकारक नाही मात्र यापूर्वीही अशापद्धतीने कार्यक्रम करण्यात आल्याचे रामलाल सांगतात. तसेच देव आपल्याला जे देतो त्यापुढे हे काहीच नाही असं सांगत रामलाल यांनी या कार्यक्रमाचे समर्थन केलं.

“हा दुधाचा अपव्यय नाहीय. गुज्जर समाजामध्ये आम्ही देवनारायणावर दुधाचा अभिषेक करतो कारण तो आमच्या जनावरांचे संरक्षण करतो,” असं सांगत रामलाल यांनी या प्रथेचं समर्थन केलं. आपल्याकडी सर्व गोष्टी या देवाच्याच आहेत. त्यामुळेच आम्ही मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली म्हणून हे दुधापासून बनवलेले पदार्थ देवाला चढवले, असं रामलाल म्हणाले.

एक कोटी रुपये खर्च करुन हे देवनारायण मंदिर दोन वर्षांच्या कालावधीमध्ये उभारलं जाणार आहे.