रक्षाबंधन म्हणजे बहिणीने भावाला राखी बांधण्याचा दिवस. राखी बांधून झाल्यानंतर प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीला छोटी मोठी का होईना पण भेटवस्तू देतो. कोणी पैशांचा आहेर देतो, कोणी साडी, कोणी दागिने किंवा कोणी आणखी काही. पण वाराणसीमध्ये राहणाऱ्या अशोक पटेल या भावाने मात्र आपल्या बहिणीला अनोखी भेट दिली आहे. त्याने आपल्या बहिणीला शौचालयाची भेट दिली आहे.

वाचा : मोदींची पाकिस्तानी बहिण, ३६ वर्षांपासून बांधते राखी

अशोकची बहिण सुनिता हिच्या सासरी शौचालय नव्हतं. शौचालय नसल्याने सुनिताला अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं होतं. अनेकदा तिला रात्री काळोखात किंवा पहाटे बाहेर जावं लागायचं. कधी कधी गावात महिलांसोबत अतिप्रसंगही व्हायचे, असं आपल्यासोबतही होईल ही भीती सुनिताच्या मनात घर करून होती. ही भीती तिने भावाकडे बोलून दाखवली. तेव्हा आपल्या बहिणीला कोणत्याही अडचणींना समोरं जावं लागू नये म्हणून अशोक यांनी तिच्या सासरी शौचालय बांधलं. विशेष म्हणजे अशोक रक्षाबंधनच्या दोन दिवस आधीच बहिणीच्या सासरी पोहोचले आणि त्यांनी स्वत: तिच्यासाठी शौचालय बांधलं. रक्षाबंधनच्या आधी हे शौचालय बांधून तयार झालं.