सध्या देशासमोर करोनाचा संकट असतानाच लडाखमध्ये भारत आणि चीनदरम्यान तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. आधीच चीनमधून करोना विषाणूचा जगभरात संसर्ग झाल्यामुळे नाराजी व्यक्त केली जात असतानाच आता या सीमेवर चीनने सुरु केलेल्या खुरापतींमुळे भारतीयांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहेत. त्यातच प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी चीनी मालावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं आहे. वांगचुक यांनी आठवड्याभरामध्ये चीनी अ‍ॅपचा वापर बंद करण्याचं आवाहन केलं आहे. या आवाहनाला अगदी सेलिब्रिटींपासून सामान्यांपर्यंत अनेकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मोहिमेचा फायदा एका भारतीय अ‍ॅपला झाला आहे. या अ‍ॅपचे स्क्रीनशॉर्ट आत्तापर्यंत तुम्ही अनेकांच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टोरीमध्ये बघितले असतील. या अ‍ॅपचे नाव आहे ‘रिमुव्ह चायना अ‍ॅप’

वांगचुक यांनी आपल्या युट्यूब चॅनेलवरुन पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये भारतीयांनी चीनी मालाबरोबर सॉफ्टवेअरचाही वापर कमी केला पाहिजे असं आवाहन केलं. “हार्डवेअरबरोबरच भारतातील तरुण मुलं टीकटॉक, शेअरइट सारख्या चीनी अ‍ॅपच्या वापराच्या माध्यमातून चीनला अनेक कोटींची मदत करत असतील. त्यामुळेच आपण एकत्र येऊन चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरु करावी. ही मोहीम भारतासाठीही एक वरदान ठरेल. आपण हे सामान वापरणं बंद केलं तर देशातील सामान वापरुन आणि त्यामधून पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे आत्मनिर्भर बनू,” असा विश्वास वांगचुक यांनी व्यक्त केला. त्यानंतर अनेकांनी आपल्या मोबाइलमधील चीनी अ‍ॅप शोधण्यास सुरुवात केली. मात्र वर वर बघता भारतीय किंवा अमेरिकन अ‍ॅप कोणते आणि चीनी अ‍ॅप कोणते हे ओळखणे कठीण असते. त्यामुळेच अनेकांनी गुगल प्ले स्टोअरवरील ‘रिमुव्ह चायना अ‍ॅप’ची मदत घेतली. हे अ‍ॅप अल्पावधीत एवढे लोकप्रिय झाले आहे की मोफत अ‍ॅपच्या यादीत हे अव्वल स्थानी पोहचले आहे.

नक्की वाचा >> “तुम्ही ‘मेड इन चायना’वर खर्च करणारा प्रत्येक पैसा भारतीय सैन्याविरोधात वापरला जाईल”

‘रिमुव्ह चायना अ‍ॅप’ आहे तरी काय?

‘रिमुव्ह चायना अ‍ॅप’ हे १७ मे रोजी गुगल प्लेवर उपलब्ध झालं आहे. अवघ्या पंधरा ते सोळा दिवसांमध्ये १० लाखांहून अधिक जणांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केलं आहे. तर एक लाख ९१ हजारहून अधिक जणांनी या अ‍ॅपला रेटींग दिलं असून गुगल प्ले स्टोअरवर याला पाच स्टार रेटींग आहे. हे अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर ते मोबाइलमधील चीनमधील कंपन्यांच्या मालकीची आणि चीनमध्ये डेव्हलप झालेली अ‍ॅप शोधून काढते. अशा अ‍ॅपची लिस्ट स्क्रीनवर झळकते. या यादीमधील जे अ‍ॅप युझर्सला काढायचे आहे त्या अ‍ॅपसमोरील डिलीट बटण क्लिक करुन हे अ‍ॅप अनइन्स्टॉल क्लिक करुन अ‍ॅप मोबाइलमधून काढून टाकता येते.

नक्की वाचा >> जगातील सर्वात वेगवान इंटरनेट; एका सेकंदात डाउनलोड करता येणार हजार HD Movies

कंपनी कोणती?

रिमुव्ह चायना अ‍ॅप हे राजस्थानमधील वनटच अ‍ॅपलॅब या कंपनीच्या मालकीचे आहे. हे या कंपनीचे पहिलेच अ‍ॅप आहे. विशेष म्हणजे हे अ‍ॅप इन्स्टॉल केल्यावर लॉगइनसाठी कोणतीही माहिती मागत नाही. मात्र या अ‍ॅपमध्ये थर्ड पार्टी अ‍ॅपचीच यादी दाखवली जाते. म्हणजेच ज्या चीनी कंपन्यांच्या फोनमध्ये प्री इन्स्टॉल मेड इन चायना अ‍ॅप असतात ते या यादीमध्ये दाखवले जात नाहीत.

अशाप्रकारे चीनी अ‍ॅपचा विरोध करण्यासाठी एखादे अ‍ॅप अल्पावधीमध्ये लोकप्रिय झाल्याची ही काही पहिली घटना नाही. काही दिवसांपूर्वीच चीनमधील टिक-टॉकला स्पर्धा देण्यासाठी मित्रो हे अ‍ॅप गुगल प्लेवर दाखल झाले आणि तेही प्रचंड लोकप्रिय झालं.