वेगवेगळ्या कामासाठी रोबोटचा वापर अनेक देशात केला जातो. पण आपल्या इथे अजूनही तितक्या प्रमाणात यंत्रमानवाचा वापर होताना दिसून येत नाही आणि हेच लक्षात घेऊन चेन्नईमधल्या दोन रेस्तराँ मालकांनी आपल्या रेस्तराँमध्ये चक्क वेटरच्या बदल्यात यंत्रमानव कामासाठी ठेवले आहेत. एखाद्या भारतीय रेस्तराँमध्ये यंत्रमानवाद्वारे सुविधा पुरवण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असेन म्हणूनच चेन्नईमधल्या या रेस्तराँमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी जमली आहे. ‘मोमो’ असं या चायनिज रेस्तराँचं नाव असून व्यंकटेश राजेंद्रन आणि कार्तिक कानन यांनी हे रेस्तराँसुरू केलं.

या रेस्तराँमध्ये सध्या चार यंत्रमानव आहेत. रेस्तराँमध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या पुढ्यात प्लेट्स ठेवणं, त्यांना अन्न वाढणं, ऑर्डर घेणं अशी कामं हे चार यंत्रमानव करतात. या यंत्रमानवांना तमिळ भाषादेखील येते असं या रेस्तराँच्या मालकांचं म्हणणं आहे. लवकरच हे यंत्रमान ग्राहकांना त्यांच्या जागेपर्यंत घेऊन जाणं, संवाद साधणं असंही काम करतील अशी आशा व्यंकटेश राजेंद्रन यांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे आपल्या रेस्तराँमध्ये येणाऱ्या ग्राहकांचे चेहरे लक्षात ठेवून त्याचं स्वागत करणार असल्याचंही राजेंद्रन यांनी सांगितले.
‘मोमो’ रेस्तराँमधील हे यंत्रमानव सगळ्यांच्याच कुतूहलाचा विषय ठरले आहेत त्यामुळे त्यांना पाहण्यासाठी ग्राहकांची गर्दी गेल्या आठवड्यापासून येथे पाहायला मिळते आहे.