जगभरात अॅपलचे चाहते काही कमी नाही. गेल्यावर्षी दशकपूर्तीनिमित्त अॅपलनं आपला सर्वात महागडा असा iPhone X जगभरात लाँच केला. या फोनची किंमत आपल्यासारख्या सर्वसामान्यांना मात्र न परवडणारीच आहे. भारतीय बाजारपेठेत या फोनची किंमत साधरण एक लाखांच्या आसपास जाते. नुकताच कॅविअॅर या रशियन कंपनीनं सोन्याचं बॅक कव्हर असलेला iPhone X बाजारात लाँच केला आहे. याची किंमत मुळ iPhone X च्या तुलनेत दुप्पट आहे.

गेल्यावर्षी अॅपलनं स्पेस ग्रे आणि व्हाईट अशा दोन व्हेरिएंटमध्ये हा फोन बाजारात दाखल केला होता. याच आयफोनला रशियन कंपनीनं वेगळ्या रुपात बाजारात आणलं आहे. २४ कॅरेट सोनं वापरून तयार केलेला हा फोन क्लासिक गोल्ड आणि क्लासिक लिक्वेड गोल्ड अशा दोन रंगात बाजारात उपलब्ध आहे. ज्याची बाजारात किंमत साधरण मुळ किंमतीपेक्षाही दुप्पट आहे. हा फोन विकत घायचा झालाच तर भारतीय मुल्याप्रमाणे या फोनसाठी साधरण पावणे तीन ते सव्वा तीन लाख रुपये ग्राहकांना मोजावे लागणार आहे. क्लासिक गोल्ड iPhone X ची किंमत साधरण २ लाख ९३ हजार आहे तर क्लासिक लिक्वेड गोल्डची किंमत ३ लाख १२ हजारांहून अधिक आहे.

कॅविअॅरनं आधीही अनेक मोबाईल व्हेरिएंटला असं नवं रुप दिलं होतं. यात नोकीयाचा फोन, त्यानंतर ट्रम्प पुतिन यांचे सोन्याचे प्रतिक असलेले बॅक कव्हर चांगलेच चर्चेत आले होते.