‘शौक बडी चीज है’, असं म्हणताना आपण अनेकदा ऐकलं असेल, पण रशियाच्या एका अब्जाधीशाने हे वाक्य तंतोतंत खरं ठरवलंय. व्हिक्टर मार्टिनोव्ह असे या अब्जाधीशाचे नाव असून फक्त बर्गर खाण्याची इच्छा झाली म्हणून त्याने दोन तासांसाठी चक्क हेलिकॉप्टर बूक केलं , अन् त्याची किंमत तब्बल दोन लाख रुपयांच्या घरात होती .

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, 33 वर्षांचा व्हिक्टर मार्टिनोव्ह त्याची गर्लफ्रेण्ड अलुष्टासोबत क्रिमियामध्ये सुट्टीवर होता. मात्र स्थानिक फूड आऊटलेटमधील जेवण काही त्यांना आवडलं नाही. दोघांना बर्गर खाण्याची इच्छा झाली, पण सर्वात जवळचं मॅक्डोनल्ड 450 किलोमीटर दूर होतं. त्यामुळे ते मॅक्डोनल्ड गाठण्यासाठी त्याने थेट हेलिकॉप्टरच बूक केलं. याबाबत सोशल मीडियामध्ये चर्चा सुरू झाल्यानंतर मॉस्को येथील कंपनीचा सीईओ असलेल्या मार्टिनोव्ह याने या घटनेची माहिती देणारा एक व्हिडिओ शेअर केलाय.

“मी आणि माझी प्रेयसी ऑर्गेनिक फूड खाऊन कंटाळलो होतो, मॉस्कोच्या दैनंदिन जीवनातलं भोजन करण्याची आमची इच्छा होती. त्यामुळे आम्ही हेलिकॉप्टर बूक केलं आणि क्रॅस्नोडारला गेलो. तिकडे मज्जा आली, आम्ही बर्गर खाल्लं आणि हेलिकॉप्टरने पुन्हा परतलो व हॉटेलमध्ये येऊन दिवसभर आराम केला”, असं मार्टिनोव्हने सांगितलं.

हेलिकॉप्टरच्या रिटर्न प्रवासासाठी त्याला दोन हजार पाऊण्ड्स म्हणजेच अंदाजे दोन लाख रुपये मोजावे लागले.