भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हा त्याच्या सामाजिक कामांसाठी ओळखला जातो. निवृत्तीनंतर तो सध्या समाजसेवेसाठी वेळ देत आहे. सचिनने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमध्ये तो रस्त्यावरून जाणाऱ्या दुकाचीस्वारांना हेल्मेट घालण्याचा सल्ला देताना दिसतो. या व्हिडीओमध्ये सचिन त्याच्या कारच्या बाजूने जाणाऱ्या दुचाकीस्वारांना हेल्मेट घालण्याची सूचना करताना दिसतो. फक्त दुचाकी चालकाने नव्हे, तर मागे बसलेल्यानेदेखील हेल्मेट घालणे तितकेच महत्वाचे असल्याचे तो सांगतो. या पोस्टमध्ये त्याने #RoadSafety म्हणजेच ‘रस्ते सुरक्षा’ हा हॅशटॅगही वापरला आहे.

या व्हिडिओत सचिनच्या कारच्या बाजूने दुचाकीस्वार जाताना दिसतात. त्यातील काही दुचाकींच्या मागच्या सीटवर बसलेल्या महिलांनी हेलमेट घातलेले नसते. त्यांनीदेखील हेल्मेट घालावे अशी विनंती सचिन त्या महिलांना करतो. सचिन या व्हिडिओच्या माध्यमातून केवळ चालकानेच नव्हे, तर मागे बसलेल्यानेदेखील हेल्मेट घालावे असा संदेश सर्वांना देतो. चालकासोबतच दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तिनेदेखील हेल्मेट घालायला हवे. मी आत्ता ज्या महिलांना सुचना केली त्या दोघींनीही हेल्मेट घातले नव्हते. माझ्या मते या वागण्याला काही अर्थ नाहीय. तुम्ही दुचाकीवर जाताना नेहमी हेल्मेट घालायला हवे, अशी कळकळीची विनंती तो कॅमेऱ्यात पाहून करताना दिसतो. काही वेळातच सचिनच्या या व्हिडीओला हजारोंच्या संख्येने लाईक आणि शेअर मिळाले आहेत.

याआधीही सचिनने अशाचप्रकारचा व्हिडिओ आपल्या फेसबुक पेजवरून पोस्ट केला होता. तर पावसाळ्यामध्ये भर पावसात मुंबईकरांच्या सोयीसाठी वाहतूक नियंत्रण करणाऱ्या वाहतूक पोलिसांचा छोटासा व्हिडीओ ट्विट करुन सचिनने पोलिसांना सलाम केला होता.  हेल्मेट घालण्याचा सचिनचा सल्ला गाडीवर मागे बसणारे किती जण खरोखरच पाळतात हे पाहाणे औत्सुक्याचे ठरेल.