सौदी अरेबियामध्ये विमानानं प्रवास करताना प्रवाशांना आता ड्रेस कोडचं पालन करावं लागणार आहे. सौदी अरेबियाच्या राष्ट्रीय विमानसेवा असणाऱ्या ‘सौदीया एअरलाईन्स’नं प्रवाशांसाठी नियमावली जाहिर केली असून त्यानुसार प्रवाशांना आता तोकडे तसेच तंग कपडे घालून या विमानसेवेच्या विमानाने प्रवास करता येणार नाही. या एअरलाईन्सच्या वेबसाईटवर याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

महिला प्रवाशांनी तोकडे आणि तंग कपडे घालू नये. ज्या कपड्यांतून हात किंवा पाय दिसतील किंवा जे कपडे पारदर्शक असतील अशा प्रकारचे कोणतेही कपडे घालून महिला प्रवाशांनी विमानात येऊ नये असं सौदीयानं म्हटलं आहे. त्याचप्रमाणे पुरूषांनी देखील तोकड्या पँट घालून प्रवास करू नये असंही त्यांनी म्हटलं आहे. जर एखाद्या प्रवाशानं हा ड्रेस कोड पाळला नाही तर कोणत्याहीक्षणी त्यांना विमानातून बाहेर हाकललं जाईल किंवा विमानानं प्रवास करण्यावर बंदी घालण्यात येईल असंही त्यांनी पत्रकात म्हटलं आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार विमानतळावर अनेक प्रवाशांना अंग झाकणारे कपडे घालण्यास भाग पाडण्यात आल्याचंही म्हटलं आहे. एअरलाईन्सच्या आदेशानंतर अनेक प्रवाशांना विमानतळावरच कपडे विकत घ्यावे लागण्याची वेळ आली असंही बातमीत म्हटलं आहे.