जेव्हा जेव्हा मानवी शरीरामध्ये नवीन पेशी तयार होतात तेव्हा व्यक्तीचे वय वाढते असं संशोधनामधून स्पष्ट झालं आहे. मानवी पेशीतील क्रमोजोम्समध्ये आढळणाऱ्या टेलोमेरेसच्या कमतरतेमुळे वय वाढतं. टेलोमेरेसला मानवी क्रमोजोममधील कॅप असं म्हटलं जातं. मात्र इस्रायलमधील वैज्ञानिकांनी वय वाढण्यासाठी कारणीभूत असलेली मानवी पेशींमधील प्रक्रियेचा प्रवाह उलट करण्यात यश मिळवल्याचा दावा केला आहे. म्हणजेच वय वाढू नये यासाठी मानवी पेशींमध्ये आवश्यक असणाऱ्या टेलोमेरेसचे प्रमाण वाढवण्यात वेज्ञानिकांना यश मिळवलं आहे. या संशोधकांनी संशोधनात सहभागी झालेल्या ३५ स्वयंसेवकांच्या शरीरामधील पेशींमध्ये टेलोमेरेस वाढल्याचं दिसून आलं आहे.
या संशोधनामध्ये सहभागी झालेल्यांसाठी तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये दर आठवड्याला ९० मिनिटांसाठीचे पाच सेशन्स घेण्यात आले. या सर्व स्वयंसेवकांना ९० मिनिटांसाठी हायपरबेरिक ऑक्सीजन असणाऱ्या खोलीत बसवले जायचे. यामुळेच या स्वयंसेवकांच्या शरीरातील पेशींमधील टेलोमेरेसचे प्रमाण २० टक्क्यांनी वाढले. यापू्र्वीही अशाप्रकारे मानवी पेशीमधील टेलोमेरेसचे प्रमाण वाढवण्यासंदर्भात प्रयोग करण्यात आले. मात्र त्या प्रयोगांना फारसे यश मिळाले नाही. मात्र यावेळी या प्रयोगामध्ये टेलोमेरेसचे प्रमाण वाढल्याचं निरिक्षणामध्ये दिसून आलं आहे.
तेल अविव विद्यापिठातील मेडिसिन आणि फॅकल्टी स्कूल ऑफ न्यूरोसायन्सचे डॉक्टर आणि या संशोधनाचे नेतृत्व करणाऱ्या शेयार एफर्टी यांनी या संशोधनाची प्रेरणा आपल्याला नासाच्या एका प्रयोगामधून मिळाल्याचं सांगितलं. “नासाच्या माध्यमातून जुडवा मुलांपैकी एकाला अंतराळात पाठवण्यात आलं आणि दुसरा पृथ्वीवरच होता. या दोघांच्या शरीरावरील परिणामांचा अभ्यास केल्यानंतर आम्हाला मानवाचे वय वाढण्यासाठी बाहेरील वातावरणाचा मूळ पेशींच्या रचनेवर होणारा परिणाम महत्वाची भूमिका बजावतो असं दिसून आलं. नासाच्या प्रयोगात सहभागी झालेल्या भावांच्या पेशींमधील टेलोमेरेसची लांबी जेवढी वाढली त्यावरुन हा निष्कर्ष काढम्यात आला,” असं एफर्टी म्हणाले. टेलोमेरेसची लांबी जितकी अधिक तितका जास्त काळ पेशी तरुण राहतात असं या संशोधनात दिसलं.
या संशोधनामध्ये सहभागी झालेल्या स्वयंसेवकांवर करण्यात आलेल्या चाचण्यामुळे सेन्सेंट सेल ३७ टक्क्यांपर्यंत कमी झाले. त्यामुळे नवीन पेशी पुन्हा निर्माण झाल्या. सेन्सेंट सेलचा प्रभाव कमी केल्यास आयुष्यमान ३३ टक्क्यांपर्यंत वाढतं हे प्राण्यांवर केलेल्या संशोधनामध्ये दिसून आलं आहे. या प्रयोगात सहभागी झालेल्या व्यक्तींच्या जीनवशैलीमध्ये किंवा खाण्याच्या सवयींमध्ये कोणताच बदल झाला आहे. प्रत्येक सहभागी व्यक्तीला मास्कच्या मदतीने १०० टक्के ऑक्सीजन देऊन हायपरबेरिक रुममध्ये ठेवण्यात आलं होतं. वाढते वय हे अल्झायमर, पार्किसन्स, पेशींमध्ये गाठ तयार होणं, कॅन्सर, हृदयरोग आणि मधुमेहासारख्या आजारांसाठी कारणीभूत ठरते असं संशोधक सांगतात.