विश्वचषकात अफगाणिस्तानविरुद्ध सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी संघर्ष करावा लागला. त्यानंतर काल(दि.27) झालेल्या वेस्ट इंडिजविरोधातील सामन्यातही सुरूवातीला भारताचा डाव संथ फलंदाजीमुळे चर्चेत राहिला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात मधल्या षटकांमध्ये महेंद्रसिंग धोनी जेव्हा खेळायला आला तेव्हा भारताचे दोन गडी झटपट बाद झाले होते. त्यामुळे धोनीने नेहमीप्रमाणे सुरुवातीला फारच संथ खेळी केली. त्यानंतर सामन्याच्या अखेरच्या षटकांमध्ये त्याने सगळी सूत्रं आपल्या हाती घेतली आणि जोरदार फटकेबाजी केली. त्याने 50 व्या षटकात 16 धावा खेचल्या व भारताला सन्मानजनक 268 धावांपर्यंत मजल मारुन दिली. त्याच्या अर्धशतकी खेळीमुळेच भारताचा डाव सावरला पण मधल्या षटकांमध्ये फिरकीपटूंसमोर केलेल्या संथगती फलंदाजीमुळे त्याच्यावर सोशल मीडिया युजर्सनी या सामन्यात देखील टीका केली. दरम्यान, भारताची फलंदाजी संपल्यानंतर माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागनेही एक ट्विट करुन फलंदाजांनी फिरकीविरोधात केलेल्या संथ फलंदाजीवर टीका केली आहे.

फिरकीविरोधात खेळताना इतका बचावात्मक पवित्रा घेऊ शकत नाही असं ट्विट सेहवागने केलं आहे. अफगाणिस्तानविरोधातील सामन्याचा दाखला देताना सेहवागने म्हटलंय की, ‘राशिद खानच्या पहिल्या चार षटकांमध्ये 25 धावा फटकावल्या होत्या पण अखेरच्या 6 षटकात केवळ 13 धावा काढल्या. आजदेखील फॅबिअन एलन याच्या पहिल्या पाच षटकांमध्ये 34 धावा चोपल्या होत्या पण अखेरच्या पाच षटकांमध्ये केवळ 18 धावा काढल्या. फिरकीविरोधात खेळताना इतका बचावात्मक पवित्रा घेऊ शकत नाही, असं सेहवागने म्हटलंय. सेहवागने या ट्विटमध्ये कुठेही धोनाच्या नावाचा थेट उल्लेख केलेला नाही. पण या दोन्ही सामन्यांमध्ये भारताकडून धोनी मैदानावर होता आणि त्याने फिरकीपटूंविरोधात बरेच निर्धाव चेंडू खेळले, परिणामी फिरकीविरोधात किंवा मधल्या षटकांमध्ये भारताची धावगती मंदावली. त्यामुळे सेहवागने अप्रत्यक्षपणे धोनीवरच निशाणा साधल्याची चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगली आहे. काही चाणाक्ष नेटकऱ्यांनी सेहवागच्या ट्विटखाली धोनीवर निशाणा साधलाय का? अशा आशयाचे ट्विट देखील केले आहेत.

यापूर्वी सचिन तेंडुलकरनेही धोनीच्या संथ फलंदाजीला लक्ष्य करताना टीम इंडियाला आवश्यकता असताना केदार जाधव आणि धोनी दोघेही चांगल्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करू शकले नाहीत अशी टीका केली होती.