18 October 2019

News Flash

हृदयद्रावक! एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात धबधब्यावरुन पडून सहा हत्तींचा मृत्यू

कळपातील दोन हत्तींना वाचवण्यात यश

सहा हत्तींचा मृत्यू

हत्ती हा सर्वात हुशार प्राण्यांपैकी एक असल्याचे म्हटले जाते. हत्ती आपल्या कळपाची आणि कळपातील प्रत्येक सदस्याची काळजी घेताना दिसतात. अनेकदा यासंदर्भातील वेगवेगळे किस्से व्हिडिओ आणि फोटोंच्या माध्यमातून समोर येत असतात. अगदी कळपामधील प्रत्येक सदस्य सोबत घेऊन प्रवास करण्यापासून शिकाऱ्यांपासून आपल्या लहान बाळाला वाचवण्यासाठी हत्तीणीने दिलेली झुंज असतो हत्तींमध्ये एकोप्याची भावना दिसून येते. मात्र याच एकोप्याच्या भावनेमुळे एका अपघातमध्ये सहा हत्तींना प्राण गमावावा लागल्याची धक्कादायक घटनासमोर आली आहे.

थायलंडमधील काओ येई राष्ट्रीय अभयारण्यामध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेमध्ये सहा हत्ती धबधब्यावरुन खाली पडले. एका हत्तीला धबधब्यावरुन खाली पडताना वाचवण्यासाठी गेलेले कळपातील इतर हत्तीही खाली पडल्याने सर्व सहा हत्तीचा जागीच मृत्यू झाला. धबधब्यावरुन खाली पडलेल्या मृत हत्तीचा फोटो व्हायरल झाला आहे. येथील हेऊ नारोक (नरकातील धबधबा) नावाने ओळखल्या जाणाऱ्या धबधब्यावरुन हे हत्ती खाली पडण्याची घटना घडली. विशेष म्हणजे याच कळपातील इतर आठ हत्तीने रस्ता अडवून धरल्याने वनअधिकारी या हत्तींच्या मागे गेल्यावर सर्व प्रकार उघडकीस आला.

अधिकारी धबधब्याजवळ पोहचले असता दोन हत्ती धबधब्याच्या कडेवर उभे असल्याचे दिसले. अधिकाऱ्यांनी समयसुचकता दाखवल्याने या हत्तींना बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर त्यांनी धबधब्याच्या वरुन खाली पाहिले असता त्यांना तीन वर्षांच्या छोट्या हत्तीचा मृतदेह दिसला. त्यानंतर धबधब्याच्या तळाशी जाऊन शोध घेतल्यानंतर तेथे इतर पाच हत्तीचे मृतदेह अधिकाऱ्यांना अढळून आले.

वाचवण्यात आलेले दोन्ही हत्ती अधिक काळ जिवंत राहण्याची शक्यता कमी असल्याचे प्राणी तज्ञांनी म्हटले आहे. हत्ती हे अन्न शोधण्यासाठी एकमेकांवर अवलंबून असतात. तसेच हत्ती हे मानवाप्रमाणे मानसिकदृष्ट्या एकमेकांवर निर्भर असतात त्यामुळेच वाचलेल्या हत्तींना मानसिक धक्क्यातून सावरणे कठीण आहे.

First Published on October 7, 2019 1:55 pm

Web Title: six elephants fall to their deaths from a waterfall while trying to save each other scsg 91