पंतप्रधान नरेंद्र मोदींची सुरक्षा काय असेल याची सगळ्यांनाच कल्पना आहे. देशाचे प्रमुखपद सांभाळणाऱ्या या व्यक्तीच्या सुरक्षेसाठी देशातील सर्वोच्च यंत्रणा कार्यरत असते. ही सुरक्षा आणखी सक्षम करण्यासाठी अनेकदा  त्यामध्ये नवनवीन बदल करण्यात येतात. आता पंतप्रधानांच्या सुरक्षा यंत्रणेत असणारे श्वानही तितकेच तरबेज हवेत.

याच ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या श्वानांमध्ये शत्रूवर हल्ल्याची क्षमता असलेले ३० श्वान, बाँबशोधक पथकातील श्वान आणि पाठलाग करणारे काही श्वान यांचा समावेश आहे. हे श्वान इस्त्रायलची राजधानी जेरुसलेम येथून मागील वर्षभरात मागविण्यात आले आहेत. हे श्वान आपल्या कामात जगात सर्वोत्तम असल्याचे म्हटले जाते.

पंतप्रधानांना दिल्या जाणाऱ्या विशेष सुरक्षा दलाकडूनच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनाही सुरक्षा पुरविण्यात येते. या यंत्रणेत लॅबरेडॉर, जर्मन शिफर्ड, बेल्जियन मालिनिओन आणि आणखी एका ‘रेअर ब्रीड’चा समावेश आहे. ‘टेलिग्राफ’ वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधानांसाठी सर्वोत्कृष्ट सुरक्षा यंत्रणा असावी, यासाठी या श्वानांचा या दलामध्ये समावेश करण्यात आला आहे.

देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर १९८४मध्ये या सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच इस्त्रायलला भेट दिली होती. यावेळी मोदी आणि इस्त्रायचे पंतप्रधान नेतान्याहू यांची झालेली भेट दोन्ही देशातील संबंध सुधारणारी ठरली.