वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट अर्थात डब्ल्यूडब्ल्यूई मध्ये भारतीय खेळाडूंबद्दल चर्चा होते तेव्हा द ग्रेट खलीचं नाव नेहमीच घेतले जाते. हिमाचल प्रदेश येथे राहणाऱ्या खलीचे खरे नाव दलीपसिंग राणा असे आहे. खली सोशल मीडियावर नेहमी अ‍ॅक्टिव्ह असल्याचं पहायला मिळत आहे. सध्या खली त्याच्या इंस्टाग्रामवरुन लोकांशी संवाद साधताना दिसत आहे. मात्र यामुळे त्याच्यासमोर एक वेगळीच समस्या निर्माण झाली आहे.

खलीच्या ऑफिशिअल इंस्टाग्राम पेजवर त्याने पोस्ट केलेल्या फोटो आणि व्हिडिओवर त्याचे चाहते विचित्र विनंत्या करत आहेत. सर तुम्ही हे करा सर तुम्ही ते करत अशा अनेक विनंत्या त्याच्या चाहत्याकडून येत आहे. कमेंट सेक्शनमध्ये येणाऱ्या या विनंत्यांमुळे डब्ल्यूडब्ल्यूईचा हा खेळाडू खूप वैतागला आहे. यामुळे खलीने आपला कमेंट सेक्शनच बंद केले आहे.

रेडिओ सिटीवरील आर जे हिमांशूला दिलेल्या मुलाखतीत त्याने यासंदर्भात माहिती दिली आहे. “मी पोस्ट केलेल्या व्हिडिओवर बहुतेक लोक कौतुक करतात, अभिनंदन करतात. तर काही जण फक्त उपहासात्मक टीका करण्यासाठी तिथे येत असतात,” असे खलीने सांगितले.

मुलाखतीदरम्यान खलीने तंदुरुस्त राहण्यासाठी प्रेक्षकांना काही उपाय सांगितले. “लोकांनी व्यायामाचा आनंद घेतला पाहिजे. तसेच शरीरावर जास्त ताण न देता व्यायाम करायला हवा नाहीतर दुखापत होईल, असे खली म्हणाला. त्यानंतर त्याने आर जे हिमांशूसोबत गाणं देखील गायलं.

लाईव्ह मुलाखतीदरम्यान लोकप्रिय स्टँडअप कॉमिक अभिषेक उपमन्युने अशी काही विनोदी कमेंट केली की या कमेंटला आतापर्यंत २००० पेक्षा जास्त लोकांनी लाईक केलं आहे. अभिषेकच्या कमेंटने तोही विचित्र विनंती करणाऱ्या चाहत्यांमध्ये सामील झाला आहे.

“सर चंद्राला तोडून टाकून रात्रीची संकल्पनाच संपवून टाका” अशी विचित्र मागणी अभिषेकने खलीकडे केली आहे. चाहत्यांच्या या विचित्र विनंत्यां पाहून खलीने नुकताच त्याचा कमेंट सेक्शन बंद केला आहे.

 

दरम्यान, अशा प्रकारच्या अनेक विनंत्या लोकांनी खलीला केल्या आहेत. यातून आता तयार झालेले मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

डब्ल्यूडब्ल्यूई सोडून खली २०१४ साली भारतात आला होता. खलीची उंची ही सात फूट १ इंच आहे. डब्ल्यूडब्ल्यूईच्या इतिहासात खली हा चौथा व्यक्ती ज्यांची इतकी उंची आहे. खलीने बिग बॉस या शोमध्येदेखील सहभाग घेतला होता. सध्या जालंधर शहरातील त्याच्या अकादमीमध्ये डब्ल्यूडब्ल्यूईचे खेळाडू खलीच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहेत.