देशभरातील तरुणांमध्ये असणारं पबजी गेमचं वेड दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. कर्नाटकमधील एका विद्यार्थ्याने विद्यापीठाच्या परीक्षेतील उत्तरपत्रिकेत उत्तरांऐवजी चक्क पबजी गेम डाउनलोड कसा करावा आणि कसा खेळावा यासंबंधी लिहिलं. यामुळे विद्यार्थी नापास झाला आहे. महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी हुशार असून गतवर्षी डिस्टिंक्शन मिळवत पास झाला होता. पबजी गेमच्या आहारी गेल्यानेच आपली दुर्गती झाल्याचं विद्यार्थ्याने सांगितलं आहे.

पबजी गेमच्या आहारी जाण्याआधी विद्यार्थी प्रत्येक विषयात टॉपर होता. आपण गेमच्या इतके आहारी गेलो होतो की अनेकदा परीक्षा जवळ आली आहे याचं भानही आपल्याला राहत नसे अशी कबुली विद्यार्थ्याने दिली आहे. पबजी गेममुळेच आपण अभ्यासावर लक्ष केंद्रित करु शकत नव्हतो असं विद्यार्थ्याने सांगितलं आहे.

विद्यार्थ्याच्या पालकांनीही अनेकदा त्याला मोबाइलमध्ये वेळ घालवताना पाहिलं होतं. पण आपण मित्रांशी चॅट करत आहोत असं खोटं सांगत विद्यार्थी पबजी गेम खेळत असे. विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका तपासणाऱ्या शिक्षकाने मुख्याधापकांकडे यासंबंधी तक्रार करत त्याच्या पालकांशी चर्चा करण्याच ठरवलं. विद्यार्थ्याच्या पालकांनी ओरडा देत मोबाइल काढून घेतला आहे. मुलानेही आपली चूक लक्षात आल्याचं म्हटलं आहे.

‘मी अभ्यासू होतो, पण पबजी गेम खूपच मनोरंजक वाटल्याने मी त्याच्या आहारी गेलो. अनेकदा मी गेम खेळण्यासाठी वर्गातून दांडी मारत जवळच्या बागेत जाऊन खेळत असे. परीक्षेदरम्यान मला स्वत:चा राग आला होता म्हणून मी पबजी गेमसंबंधी लिहिलं. आता माझ्या पालकांनी मोबाइल काढून घेतला आहे, पण अजूनही माझ्या डोक्यात विचार सुरु आहेत. हा गेम किती धोकादायक आहे हे मला आता कळतंय’, असं मुलाने सांगितलं आहे.