पादण्याची सवय अत्यंत लज्जास्पद मानली जाते. त्यामुळे अनेकदा त्यांच्यावरच नाही तर त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीचीदेखील नाचक्की होते. अशा अनेक घटना आपल्या आजूबाजूला दैनंदिन जीवनात घडतच असतात. पण पादणाऱ्यांसाठी आता एक मोकळं रान मिळणार आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. कारण भारतात पहिलीच ‘पाद स्पर्धा’ आयोजित करण्यात येत आहे. ‘व्हॉट द फार्ट’ ही स्पर्धा सुरतमध्ये २२ सप्टेंबर रोजी पार पडणार आहे.

४८ वर्षीय गायक व अभिनेता यतिन संगोई आणि त्यांचे सहकारी मुल संघवी यांची ही अनोखी कल्पना आहे. ही कल्पना कशी सुचली याबद्दल यतिन सांगतात, ”माझ्या कुटुंबीयांसोबत सिनेमा बघायला गेलो होतो तेव्हा चित्रपटगृहात मी मोठ्याने पादलो. एकजण माझ्यावर हसला आणि म्हणाला की पादण्याची स्पर्धा असल्यास तुम्हीच त्यात जिंकणार. त्यावेळी माझ्या डोक्यात या स्पर्धेविषयीचा विचार आला. चीन, अमेरिका या देशांमध्ये पादण्याच्या स्पर्धा होतात. इतकंच नव्हे तर त्याचा वर्ल्ड कपसुद्धा आहे. पण भारतात आतापर्यंत अशी स्पर्धा झालीच नाही.”

या स्पर्धेत मोठ्या आवाजात व एका लयात पादणाऱ्या व्यक्तीला ट्रॉफीसोबतच पाच ते पंधरा हजार रुपयांपर्यंत बक्षीस मिळणार आहे. १०० रुपये भरून या स्पर्धेसाठी तुम्हाला नोंदणी करता येणार आहे.