भारतीय गायकाने एखादे गाणे गाऊन रसिकांना मंत्रमुग्ध करणे ठिक आहे. आपल्या गायकीतून हा गायक प्रेक्षकांची वाहवा मिळवतो. पण एखाद्या ब्रिटीश गायकाने हिंदीतील एखादे जुने गाणे गाऊन रसिकांची पसंती मिळवणे ही निश्चितच कौतुकास्पद गोष्ट आहे. नुकताच एका ब्रिटीश गायिकेने गायलेल्या गाण्याचा व्हिडियो व्हायरल होत आहे आणि त्याला भारतीयांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. ‘आज जाने की जिद ना करो’ हे फय्याज हाश्मी यांनी लिहीलेले गाणे पाकिस्तानी गायिका फरीदा खानम यांनी गायलेले आहे. सध्या तान्या वेल्स या ब्रिटीश गायिकेने गायल्याने या गाण्याची बरीच चर्चा होत आहे.

लाहोरमधील एका कार्यक्रमात गायलेली ही गझल नोव्हेंबर २०१७ मध्ये गायली गेली होती. तान्या हिने उत्तर भारतात राहून बराच काळ भारतीय भाषा आणि संगीताचा अभ्यास केल्याने तिने यामध्ये प्रभुत्व मिळवले आहे. मूळची लंडनची असलेली तान्या आपली मातृभाषा नसूनही अतिशय नेमकेपणाने ही गझल गात असल्याचे व्हिडियोमध्ये दिसते. यामध्ये तिने पेहरावही भारतीय केल्याने तिने रसिकांची मने जिंकली आहेत. इतकेच नाही तर भाषेतील बारकावे आणि शब्दांचे अर्थ तिच्या गायकीतून उत्तम पद्धतीने उतरल्याने तिच्या या गाण्याचे कौतुक होताना दिसत आहे. त्यामुळे एका परदेशी गायिकेने मनापासून गायलेली ही भारतीय भाषेतील गझल तुम्हीही एकदा ऐकाच.