आंध्र प्रदेशसाठी विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीवरून तेलुगू देशम पार्टीचे खासदार एन शिवाप्रसाद महिलेच्या वेशात संसदेत पोहोचले. विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीवरून तसेच तेलंगणामध्ये आरक्षणाशी निगडीत मुद्द्यावरून तेलुगू देशम पार्टी (टीडीपी) आणि वायएसआर काँग्रेस आणि तेलंगणा राष्ट्र समितीच्या (टीआरएस) सदस्यांनी लोकसभेचे काम सुरू होण्याआधीच गोंधळ घालण्यास सुरूवात केली. टीडीपीने सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची नोटीस दिली होती. पण मोदी सरकारवर अविश्वास प्रस्ताव दाखल करता आला नाही. तेलुगू देशम पार्टी आपल्या विविध मागण्यांसाठी जोरदार विरोध करत आहे आणि या विरोधाचा एक भाग म्हणून खासदार एन शिवाप्रसाद महिलेच्या वेशात संसदेत पोहोचले.

अंगावर साडी चोळी, कपाळावर टिकली, गळ्यात दागिने केसात फुलं अशा वेशात एन शिवाप्रसाद यांनी सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. विशेष म्हणजे काँग्रेसच्या खासदार रेणूका चौधरी यांनीही त्यांना पाठिंबा दिला आहे. गेल्याआठवड्यात शिवाप्रसाद पारंपारिक मश्चिमारांच्या पेहरावत दिसले होते. विशेष म्हणजे आपण हा वेश का केला याबद्दल सांगताना ते म्हणाले की ‘मोदीसाहेब संसदेत दिसत नाहीत, ते अनेकदा परदेश दौऱ्यावरच असतात. जनतेला काय हवंय ते करत नाहीत. त्यामुळे मला त्यांना जाळ्यात पकडायचं आहे”
याआधीही अनेक प्रकारांची वेशभूषा करत शिवाप्रसाद संसदेत पोहोचले होते. कधी श्रीकृष्ण तर कधी बाबा साहेबांचा वेश परिधान करत ते संसदेत ते पोहोचले होते.