मूळ आकारापेक्षा चौपट आकारांच्या भाज्यांचे व्हायरल झालेले फोटो आपण अनेकदा फेसबुक किंवा अन्य सोशल मीडियावर पाहतो. मोठ्या आकाराच्या भाज्या पिकतात कशा असा प्रश्न आपल्यालाही पडत असेल पण जगाच्या पाठीवर असे एक राज्य आहे ज्या राज्यात मूळ आकारापेक्षा चौपट आकाराचा भाजीपाला पिकतो.

अलास्का राज्यातील अनेक शेतक-यांच्या नावावर चौपट आकाराचा भाजीपाला पिकवण्याचा विक्रम आहे. भोपळा, कोबी, फुलकोबी तसेच अनेक कंदमुळे पिकवण्याचा विक्रम या राज्यातील शेतक-यांनी मोडून काढला आहे. या चौपट आकाराचा भाजीपाला पाहून यासाठी खत किंवा इतर रसायनांचा वापर केला जात असेल असे तुम्हालाही वाटत असेल. पण यामागचे रहस्य वेगळे आहे. आलास्का हे भौगोलिक दृष्ट्या उत्तर ध्रुवाच्या अधिक जवळ येते, त्यामुळे या राज्यात वर्षांतील फक्त १०५ दिवसच भाजीपाल्याचे उत्पन्न घेतले जाते. कारण २६० दिवस हा संपूर्ण परिसर बर्फाने झाकला जातो त्यामुळे उन्हाळ्यात येथे भाजीपाला पिकवला जातो. या काळात पिकला भरपूर सूर्यप्रकाश मिळतो म्हणूनच येथील भाज्यांचा आकार हा दुप्पट असतो. दिवसातील २४ तासांपैकी येथे १९ तास ऊन असते म्हणून येथील भाज्या अधिक जोमात वाढतात. दरवर्षी या राज्यात भाज्यांची जत्रा भरवली जाते. यात शेकडो शेतकरी भाग घेतात.