गिनिज विश्वविक्रमात आतापर्यंत अशा कित्येक विक्रमांचा समावेश झाला आहे. या यादीत आणखी एका जोडप्याने देखील आपले नाव निश्चित केले आहे. जगातील सर्वाधिक कमी उंची असलेले जोडपे असल्याचा विश्वविक्रम त्यांच्या नावे जमा झाला आहे. पाओलो आणि कॅट्यूसा या जोडप्यांच्या नावे हा विश्वविक्रम आहे.

वाचा : VIDEO : भारताचा ‘मॅग्नेट मॅन’!

पाओलो आणि कॅट्यूसा या दोघांचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. लंडनमधल्या चर्चमध्ये त्यांचा विवाहसोहळा संपन्न झाला. याच दिवशी जगातील सगळ्यात कमी उंची असलेल्या जोडप्याचा मान मिळवत त्यांनी गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव निश्चित केले. सोशल मीडियावर या दोघांची भेट झाली. गेल्या आठ वर्षांपासून ते एकमेकांना ओळखतात. पाओलो हे लीगल सेक्रेटरी म्हणून कार्यरत आहेत, तर कॅट्यूसा ही ब्युटीशिअन आहे. त्यांच्या उंचीवरून अनेकदा त्यांच्यावर विनोद केले गेले पण दोघांनी याकडे दुर्लक्ष करत एकमेकांची साथ कधीच सोडली नाही. या दोघांचीही उंची दोन ते अडीच फूटांच्या आसपास आहे. त्यांच्या लग्नातले काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

वाचा :  सेल्फीच्या वेडामुळे ‘तो’ गिनीजबुकमध्ये झळकला

आठवड्याभरापूर्वी अशाच एका भारतीय जोडप्याची सोशल मीडियावर चर्चा झाली होती. जगातील सर्वाधिक काळ टिकलेले आणि एकत्र राहिलेले जोडपे म्हणून या जोडप्याला ओळखले जाते. १९६० च्या दशकात इंग्लडमध्ये स्थायिक झालेले करम चंद आणि करतरी हे गेल्या ८८ वर्षांपासून एकत्र आहेत. त्यांना ८ मुले, २६ नातवंड आणि २७ पतवंड आहेत. या दोघांनी वयाची शंभरी केव्हाच ओलांडली आहे. ज्या देशात घटस्फोटाचे किंवा विभक्त राहण्याचे प्रमाण अधिक आहे अशा प्रत्येकाला या जोडप्याचे उदाहरण दिले जाते.