सध्याचं जग हे डिजीटल जग आहे. केंद्र सरकारनेही डिजीटल इंडिया मार्फत अनेक महत्वाच्या गोष्टी इंटरनेटद्वारे सोप्या करण्याची सुरुवात केली आहे. कॉलेजचा प्रवेश, एखाद्या योजनेचे फॉर्म, बँकेची कामं आजकाल इंटरनेट द्वारे होतात. लोकांना अधिक डिजीटल साक्षर करण्याचा सरकारचा हेतू आहे. यासाठी भारताच्या गावा-गावात इंटरनेट सुविधा पुरवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. इंटरनेटच्या माध्यमातून अनेक गावांनी प्रगती करत आपलं नाव जगाच्या नकाशावर झळकवल्याच्या बातम्याही आपण अनेकदा पाहिल्या असतील. परंतू आजही भारतात इंटरनेटचा स्पीड हा नेहमी चर्चेत असणारा मुद्दा असतो.

ग्रामीण भाग सोडा शहरातही काही भागांमध्ये ग्राहकांना इंटरनेट स्पीडची समस्या येते. मात्र वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड तालुक्यातील येवता गावात CSC केंद्रात काम करणाऱ्या गजानन देशमुख यांनी एक शक्कल लढवली. शेतकऱ्यांच्या पिक विम्याचे अर्ज भरताना इंटरनेट स्पीडचा त्रास होत होता. यासाठी देशमुख यांनी घराच्या छतावर स्पीड चांगला येतो, म्हणून थेट छतावर खुर्ची आणि लॅपटॉपची सोय करत शेतकऱ्यांच्या पिक विम्याचे अर्ज भरले. देशमुख यांचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. All India Radio News Pune च्या फेसबूक अकाऊंटवरही हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे.

अनेकदा अधिकारी वर्ग काम करत नाही अशी सर्वसामान्य जनतेची ओरड असते. बहुतांश वेळा ही बाब खरी असली तरीही इंटरनेट स्पीडचं कारण न देता मिळेल त्या परिस्थितीत शेतकऱ्यांचं काम करण्यासाठी छतावर चढून अर्ज भरणाऱ्या गजानन देशमुख यांचं कौतुक व्हायलाच हवं.

अवश्य वाचा – Viral Video : ‘ती’ चं मन श्रीमंत होतं, दुकान सांभाळत मोराला भरवणारी भाजीवाली ठरतेय चर्चेचा विषय