विमान प्रवास हा सर्वात वेगवान मानला जातो. पण कधी कधी हाच प्रवास खूप कंटाळवाणा देखील असतो. आता प्रवाशांसाठी खाण्यापिण्यापासून ते मनोरंजनापर्यंत सगळीच सोय विमानात असते पण या सगळ्यात मन तरी किती रमणार म्हणा? तेव्हा वेळेमुळे अनेकांना विमानाचा प्रवास नकोसा वाटतो. पण आम्ही तुम्हाला अशा विमान प्रवासाबद्दल सांगणार आहोत, जो करण्यासाठी प्रवाशांना फक्त काही सेकंदाचा अवधी लागतो. स्कॉटलंडमधल्या वेस्टरे ते पापा वेस्टरे या दोन बेटांना जोडणारी ही विमानसेवा आहे. केवळ अडीच किलोमीटरएवढ्या पल्ल्यासाठी लोगन एअरनं ही विमानसेवा सुरू केलीये. या प्रवासाला फक्त ५३ सेकंद लागतात. कधी कधी वाऱ्याची दिशा बदलली तर हा अवधी ५३ सेकंदावरून २ मिनिटांवर जातो.

प्रवासी विमानात चढून स्थिरस्थावर होत नाही तोच विमान इच्छितस्थळी पोहोचते देखील. म्हणूनच हा जगातील सर्वात लहान विमान प्रवास म्हणून ओळखला जातो. आतापर्यंत जवळपास १० लाख लोकांनी या विमानमार्गाने प्रवास केलाय. या विमानाने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना जवळपास दीड हजार रुपये मोजावे लागतात. १९६७ मध्ये ही सेवा सुरु करण्यात आली ती आजतागायत सुरु आहे. आठवड्यातून सहा दिवस ही विमानसेवा सुरू असते. पापा वेस्टरे हे ऐतिहासिक स्थळ आहे. तेव्हा अनेक विद्यार्थी आणि शिक्षक या स्थळाला भेट देण्यासाठी या विमानसेवेने प्रवास करतात.