त्याला डाऊन सिंड्रोम असल्याने २ वर्षाचा होऊनही तो काही बोलू शकत नाही…पोटचे मूल असे आजारी असल्याने आई-वडिलांनाही नेमके काय करावे ते कळत नाही… पण या चिमुकल्याला या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी त्याची मोठी बहीण आणि संगीत यांनी अतिशय चांगला आधार दिला आहे…. अमांडा बोमन यांनी आपल्या मोठ्या मुलीला आपली आंघोळ होईपर्यंत तिच्या लहान भावाकडे लक्ष देण्यास सांगितले. त्यावेळी या मुलीने आपल्या भावाला सांभळण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवली आणि त्या दोघांनी मिळून गाणी म्हटली.

डाऊन सिंड्रोम असणाऱ्या मुलांना बोलण्याच्या समस्या असतात. या मुलांना अतिशय कष्टाने काही शब्द बोलावे लागतात. त्यासाठी या मुलांना विशेष प्रशिक्षणही द्यावे लागते. पण या लिडियाने आपला भाऊ बा याला अतिशय सोप्या पद्धतीने दोन शब्द शिकवले आहेत. ती आपल्या या लहानग्या भावाला गाणे म्हणून दाखवत असताना नकळत तो ‘हॅपी’ आणि ‘यू’ हे शब्द बोलायला लागला. हा व्हिडिओ या मुलांच्या आईने आपल्या फेसबुक अकाऊंटवर अपलोड केला आहे. तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून या बहीण-भावांचे कौतुक होत आहे. बो हा २५ महिन्यांचा असून आता त्याला केवळ १२ शब्द बोलता येतात. पण संगीत आणि गाणे यांच्या मदतीने तो अतिशय चांगल्या पद्धतीने शब्द शिकतो. म्युझिक थेरपी ही अतिशय उत्तम उपचार पद्धती असून त्याचा चांगला फायदा होत आहे.