इंटरनेटच्या सध्याच्या युगात डेटा चोरीच्या, खासगी माहिती चोरण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशाप्रकारांना आळा घालण्यासाठी गुगलकडून सातत्याने प्रयत्न सुरू असून नुकतेच 49 अ‍ॅप्स प्ले-स्टोअरवरुन हटवण्यात आले आहेत. गुगलच्या सिक्युरिटी सिस्टिमला चकमा देणारे हे 49 अ‍ॅप्स प्ले-स्टोअरवरुन हटवण्यात आलेत. 30 लाखांहून अधिक युजर्सनी हे अ‍ॅप्स डाऊनलोड केले आहेत. उपकरणांमध्ये जाहिरातींद्वारे मॅलवेअर (व्हायरस) सोडत असल्यामुळे हे अ‍ॅप्स गुगलने हटवल्याची माहिती आहे. ‘ट्रेंडमायक्रो’ने याबाबत गुगलला अलर्ट केल्यानंतर हे अ‍ॅप्स हटवण्यात आले आहेत.

‘ट्रेंडमायक्रो’च्या अहवालानुसार हे अ‍ॅप्स 30 लाखांहून अधिक डिव्हाइसमध्ये इंस्टॉल करण्यात आले आहेत. या अ‍ॅप्सद्वारे युजर्सना अनावश्यकपणे जाहिराती दाखवल्या जात होत्या. यामध्ये थर्ड पार्टी अ‍ॅप्स आणि गेमिंग अ‍ॅप्सचा समावेश आहे. हे अ‍ॅप्स डाउनलोड केल्यानंतर काही तासांनी जाहिराती दाखवण्यास सुरूवात करतात. त्यामुळे नेमक्या कोणत्या कारणामुळे जाहिराती दिसतायेत याबाबत युजरला समजत नाही. हे अ‍ॅप्स बंदही करता येत नाहीत. तसंच, हे अ‍ॅप्स गुगल क्रोमलाच डिफॉल्ट ब्राउझर बनवायचे. म्हणजे, जर तुमच्या स्मार्टफोनच्या स्क्रीनवर एखादा गुगल क्रोमचा शॉर्टकट आपोआप तयार झाला असेल तर तुमच्या स्मार्टफोनवर मॅलवेअर अटॅक झाला असं समजावं. त्यामुळे हे अ‍ॅप्स तातडीने डिलीट करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. खाली दिलेल्या फोटोमध्ये हटवण्यात आलेल्या अ‍ॅप्सची यादी देण्यात आली आहे. जर तुमच्या फोनमध्येही यापैकी कोणतं अ‍ॅप असेल तर तातडीने डिलीट करा.