विमान प्रवासात कधी काय अडचण येईल आणि होईल सांगता येत नाही. काहीवेळा तर अशाप्रकारच्या घटना घडल्या की, विमानाचे अचानक लँडिंग करावे लागते. नैरोबीपासून इस्तंबूलकडे जाणाऱ्या तुर्की एअरलाइन्सच्या विमानाचेही असेच अचानक लँडिंग करावे लागले. सुदान याठिकाणी या विमानाचे लँडिंग केले. आता यामागील कारण ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. विमानातील प्रवाशांना आपल्या मोबाईलवर ‘बॉम्ब ऑन बोर्ड’ या नावाचे वाय-फाय नेटवर्क दिसत होते.

आता अशापद्धतीचे नाव असल्याने प्रवाशांनी याबाबत विमान कर्मचाऱ्यांकडे तक्रार केली. कर्मचाऱ्यांनाही ही गोष्ट गंभीर असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी वैमानिकाला याबाबत कल्पना दिली. त्यानंतर विमान लँड करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि विमान सुदानमध्ये उतरविण्यात आले. यानंतर संपूर्ण विमानाची कसून तपासणी करण्यात आली. त्यावेळी एका प्रवाशाच्या वाय-फायचे नाव ‘बॉम्ब ऑन बोर्ड’ असल्याचे लक्षाात आले. हेच नेटवर्क इतर प्रवाशांच्या मोबाईलवर दिसत असल्याचे यावेळी समजले.

एखादी आपतकालीन परिस्थिती उद्भवल्याशिवाय वैमानिकाकडून सहसा विमान अचानकपणे लँड करण्याचा निर्णय घेतला जात नाही. यासाठी विमानातील इंधन संपणे, विमानात तांत्रिक बिघाड उद्भवणे, हवामान खराब होणे, अशी कारणे असू शकतात. मात्र वाय-फायचे कारण अतिशय हास्यास्पद असल्याचे दिसते. काही दिवसांपूर्वीच कतार एअरवेजच्या विमानात नवरा-बायकोचे भांडण झाल्याने या विमानाचे लँडिंग करावे लागले होते. यामध्ये विमान चेन्नई येथे अचानकपणे उतरविण्यात आले. तर गो इंडिगोच्या थिरुवअनंतपूरमहून बंगळूरुला निघालेल्या विमानात नुकताच एका प्रवाशाच्या बॅगेतील लॅपटॉपला आग लागल्याची घटनाही घडली होती.