इरमा या चक्रीवादळाचा फटका जसा माणसांना बसलाय तितकाच तो प्राण्यांनाही बसला आहे. काही प्राणीप्रेमी संघटनांनी पुढाकार घेऊन वादळाच्या तडाख्यात सापडलेल्या प्राण्यांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्याचे काम करत आहेत. या वादळाच्या घडामोडींचे वार्तांकन करण्यासाठी अनेक वृत्तवाहिन्यांचे पत्रकार फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर जमले होते. पण वार्तांकन करत असलेल्या काही पत्रकारांनी मात्र आपलं कर्तव्य काही काळ बाजूला ठेवत डॉल्फिन्सना वाचवण्यासाठी धाव घेतली.

‘एनबीसी’ आणि ‘फॉक्स फोर’ वृत्तवाहिनीचे पत्रकार फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर वार्तांकन करत होते. मात्र, त्यावेळी त्यांना किनाऱ्यावर जखमी अवस्थेतील दोन डॉल्फिन्स दिसले. त्यावेळी केरी सँडर्स आणि टॉमी रसल वार्तांकन थांबवून डॉल्फिनची मदत करण्यासाठी धावून गेले. किनाऱ्यावर फार कमी लोक उपस्थित होते. जर आपण वेळीच मदत केली नसती तर दोन्ही डॉल्फिन्सचा जीव गेला असता. म्हणून या दोघांनी इतर काही लोकांच्या मदतीने डॉल्फिन्सना समुद्रात सोडले.

इरमा चक्रीवादळाने फ्लोरिडामध्ये मोठ्याप्रमाणावर वित्तहानी झाली आहे. अनेक लोक बेघर झालेत. पण इथल्या काही स्वयंसेवी संस्थांनी माणसांसोबत प्राण्यांचेदेखील प्राण वाचावेत, यासाठी पुढाकार घेतला आहे. गेल्याच आठवड्यात फ्लोरिडामधील प्राणीप्रेमी संस्थांनी विमानाद्वारे प्राण्यांना सुरक्षित स्थळी पोहोचवले होते.