ट्विटरवर सध्या एक फोटो व्हायरल होतोय. या फोटोमध्ये एका लाकडाखालून एक पाय बाहेर येताना दिसत आहे. हा एखाद्या माणसाचा किंवा प्राण्याचा पाय असावा असा अंदाज अनेकजणांनी व्यक्त केला, पण त्यांचं सगळ्यांचं उत्तर चुकलं. हा फोटो एक दिवसापूर्वीच ट्विटरवर भारतीय वन अधिकारी सुशांत नंदा यांनी शेअर केला आहे. फोटो शेअर करताना, ‘तुम्ही या प्राण्याला ओळखू शकता का?’ असा प्रश्न त्यांनी विचारला.

रविवारी हा फोटो शेअर केल्यापासून 1,000 पेक्षा जास्त जणांनी लाइक केला आहे. अनेक नेटकऱ्यांनी त्यावर विविध प्रतिक्रिया दिल्या असून याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. कोणी हा लंगूर किंवा चिंपांजी असल्याचं म्हटलं, तर काहींनी हा गोरिल्ला असू शकतो असं म्हटलं. पण एकालाही नेमकं उत्तर देता आलं नाही.


अखेर नंदा यांनी स्वतःच या प्रश्नाचं उत्तर दिलं आणि फोटोमध्ये पायासारखी दिसणारी ती एकप्रकारची ‘बुरशी’ असल्याचा खुलासा केला. “ही एकप्रकारची बुरशी आहे ” असं त्यांनी सांगितलं. नंदा यांनी मानवाच्या पायासारखा आकार असणाऱ्या या बुरशीबाबत माहिती देणारी एक वेबसाइटची लिंकही शेअर केली. त्या वेबसाइटवर अशाप्रकारच्या बुरशीला ‘डेड मॅन फिंगर्स’ किंवा Xylaria polymorpha ‘झाइलारिया पॉलीमॉर्फ’ याच्या रुपात ओळखलं जातं, अशी माहिती देण्यात आली आहे.