आपल्या देशामध्ये चहाप्रेमींची संख्या अफाट आहे. काही जण तर असे आहेत, की चहाचा एक घोट घेतल्याशिवाय त्यांच्या दिवसाची सुरुवात होत नाही. रिमझिमणारा पाऊस असो किंवा टळटळीत ऊन.  चहा प्यायल्यामुळे थकवा,मरगळ दूर होते, गप्पांचा फड रंगतो हे आतापर्यंत साऱ्यांनी ऐकलं आहे. त्यामुळे चहाचं महत्त्व किती आहे हे काही वेगळं सांगायला नको. पण जर का तुम्हाला कोणी सांगितलं की केवळ माणसांचंच चहावर प्रेम नसतं तर काही प्राण्यांनाही चहा आवडतो तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? सहाजिकच आहे कोणी यावर विश्वास ठेवणार नाही. परंतु हो. इंग्लंडमध्ये एक असा घोडा आहे ज्याचं चहावर नितांत प्रेम असून सकाळचा चहा घेतल्याशिवाय त्याच्या दिवसाची सुरुवात होत नाही.

इंग्लंडमधील मर्सीसाइड पोलीस ठाण्यात एक घोडा गेल्या १५ वर्षांपासून दररोज सकाळी चहा पितो. विशेष म्हणजे चहाचा घोट घेतल्याशिवाय तो कोणतंही काम करत नाही. या घोड्याचं नाव जॅक असं असून आता तो २० वर्षांचा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एकदा जॅकच्या ट्रेनरने त्याला सहज एक कप चहा पाजला होता. परंतु तेव्हापासून जॅक दररोज चहाची मागणी करु लागला. आज १५ वर्ष झाले जॅक दररोज सकाळी एका मोठ्या चहाच्या कपात चहा पितो. इतकंच नाही तर चहा घेतल्याशिवाय त्याच्या दिवसाची सुरुवात होत नाही. सध्या सोशल मीडियावर जॅकचा चहा पितांनाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये जॅक चहा पितांना दिसत आहे.


“जोपर्यंत जॅकला चहा मिळत नाही तोपर्यंत तो झोपेतून उठत नाही. मात्र चहा मिळाल्यानंतर तो त्याच्या दिवसाची सुरुवात करतो. इतकंच नाही तर जॅकला फक्त स्किम मिल्कपासून तयार केलेलाच चहा लागतो. तसंच त्याला दोन चमच्यांपेक्षा अधिक साखर चालत नाही”, असं मर्सीसाइड पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितलं.

दरम्यान, सध्या जॅकचा चहा पितांनाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. आतापर्यंत २ लाखांपेक्षा अधिक जणांनी हा व्हिडीओ पाहिला असून त्यावर कमेंट आणि लाइक्सचा पाऊस पडत आहे.