लग्नसराईच्या या मोसमात उत्तर प्रदेशातील आजमगढच्या एका तरुणाचं स्वप्न मात्र धुळीस मिळालं. झालं असं की, आजमगढचा रहिवासी असलेल्या तरुणांचं 10 डिसेंबर रोजी मऊ जिल्हातील तरुणीशी लग्न होणार होतं. लग्नाच्या रात्री नवऱ्यासह आलेल्या वऱ्हाडी मंडळीने नवरी मुलीचं घर शोधण्यासाठी रात्रभर सगळं मऊ पालथं घातलं, पण त्यांना मुलीच्या घराचा पत्ता काही सापडला नाही, किंवा मुलीच्या कुटुंबाबतची साधी माहितीही कोणाकडून मिळाली नाही. अखेर सगळी वरात रिकाम्या हाती घरी परतली.

त्यानंतर नवऱ्याकडील मंडळीचा सर्व राग सोयरीक जुळवणाऱ्या महिलेवर निघाला. घरी परतल्यानंतर त्यांनी सोयरीक जुळवणाऱ्या त्या महिलेला ओलीस ठेवलं. नंतर याबाबतची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि महिलेची सूटका केली. मुलीच्या कुटुंबीयांनी मलाही फसवलं व मूर्ख बनवलं असा त्या महिलेने दावा केला.

मिळालेल्या माहितीनुसार, छटवारामध्ये राहणाऱ्या एका महिलेने मऊ जिल्ह्यातील मुलीबाबतची माहिती मुलाच्या कुटुंबीयांना दिली होती. नंतर दोन्ही कुटुंबीय लग्नासाठी तयार झाले. पण लग्न ठरवण्याआधी मुलाकडच्यांनी मुलीच्या घराबाबत तपास केला नाही आणि इथेच त्यांची चूक झाली. लग्नाची तारीखही ठरवण्यात आली होती, आणि मुलाच्या कुटुंबीयांनी मुलीच्या कुटुंबीयांना बँडबाजा आणि लाइट वगैरेसाठी 20 हजार रुपये रोख दिले होते. पण लग्नाच्या दिवशी वरात घेऊन गेल्यावर मात्र त्यांना मुलीच्या घरचा पत्ताच सापडला नाही, रात्रभर त्यांनी घर शोधण्याचा प्रयत्न केला पण अपयशी ठरले. अखेर सकाळी सर्व नवऱ्यासह सर्व वऱ्हाडी मंडळी घरी परतली. दरम्यान, सोयरीक जुळवणाऱ्या त्या महिलेला आणि मुलाच्या कुटुंबीयांना पोलीस स्थानकात नेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे.