एखाद्या समारंभासाठी तयार होणे म्हणजे महिलांसाठी मोठे कामच असते. मग मी हे घालू की ते घालू असा प्रश्न शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना कायम पडतो. त्यातही जर तुम्ही दुसऱ्या देशात असाल, तेही एका वरिष्ठ पदावर आणि तुम्हाला त्या देशातील सर्वोच्च सोहळ्याप्रसंगी उपस्थित राहायचे असेल तर तुमची अशी परिस्थिती होणे स्वाभाविकच आहे. आता हेच पाहा ना भारतातील अमेरिकन दूतावासामध्ये राजदूत असलेल्या मेरिके कर्लसन यांनाही आपण काय घालावे असा प्रश्न पडला. तेव्हा त्यावर उपाय म्हणून त्यांनी काय केले माहित आहे?

या राजदूत बाईंनी थेट आपल्या ट्विटर अकाऊंटवर मी कोणती साडी नेसू, असे विचारणारे आपले फोटोच अपलोड केले. नागरिक आपल्याला यासाठी मदत करतील अशी आशा असलेल्या त्यांना ट्विटरवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रियाही आल्या. आयुष्यात पहिल्यांदाच साडी नेसणार असल्याने आपण काहीशा संभ्रमावस्थेत आहोत असेही त्यांनी यामध्ये म्हटले आहे.

मेरिके यांनी चार वेगवेगळ्या साड्या नेसून आपले फोटो आणि व्हिडिओ ट्विटरवर अपलोड केले. जमदानी, ड्यूपियन, कांजीवरम आणि तुसर अशा चार साड्या त्यांनी नेसल्या. यातील कोणती साडी १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाच्या समारंभाला नेसू असा प्रश्न त्यांनी सोशल मीडियावर विचारला. विशेष म्हणजे त्यांनी केलेल्या या आवाहनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून ट्विटर यूजर्सनी त्यांना आपल्याला आवडलेला पर्यायही सांगितला.

कर्लसन पहिल्यांदाच साडी नेसणार असल्याने त्या याबाबत अतिशय उत्साही आहेत. १५ ऑगस्टसाठी त्यांनी खास साड्या खरेदीही केल्या आहेत. मात्र या चार साड्यांमधील नेमकी कोणती नेसावी हे लक्षात येत नसल्याने त्यांनी हा पर्याय अवलंबला. यावर त्यांना दोन हजार प्रतिक्रिया आणि सुमारे १०० हून अधिक ट्विट आले आहेत. ट्विटर यूजर्सनी त्यांना आपल्याला आवडलेला पर्यायही सांगितला आहे. मात्र यात आता नेमकं कोण जिंकणार हे पाहण्यासाठी १५ ऑगस्टची वाट पाहवी लागणार आहे.