जर तुम्हाला कोणी विचारलं की 10 वर्षांपूर्वी हरवलेली तुमची एखादी गोष्ट आठवतेय का…तर कदाचित तुमचं उत्तर असेल की 10 वर्षांपूर्वीचं कशाला कोणाच्या लक्षात राहील. तुमचं म्हणणं योग्य आहे, इतकी जुनी गोष्ट कदाचित कोणाच्या लक्षात राहणार नाही. पण, जर 50 वर्षांपेक्षा आधी हरवलेली एखादी गोष्ट अचानक तुम्हाला भेटली तर काय होईल? कॅलिफोर्नियामध्ये हे खरोखरं घडलं आहे. एका व्यक्तीला त्याचं 53 वर्षांपूर्वी हरवलेलं पाकिट भेटलं. हैराण करणारी बाब म्हणजे हे पाकिट 1967 मध्ये अंटार्क्टिकात हरवलं होतं.

1967 मध्ये अंटार्क्टिकात हरवलं पाकिट :-
झालं असं की, ऑक्टोबर 1967 मध्ये अमेरिकेच्या नौसेनेतील हवामानशास्त्रज्ञ पॉल ग्रिशम यांना अंटार्क्टिकात पाठवण्यात आलं होतं. तिथे त्यांनी रॉस बेटावर हवामानशास्त्रज्ञ म्हणून काम केलं. याच दरम्यान त्यांचं पाकिट हरवलं. नंतर तिथलं काम संपवून 13 महिन्यांनी ते कॅलिफॉर्नियात आपल्या घरी परतले.
त्यानंतर आता 30 जानेवारी 2021 रोजी 91 वर्षांच्या ग्रिशम यांना त्यांचं हरवलेलं पाकिट परत भेटलं.

लॉकरच्या मागे सापडलं पाकिट :-
ग्रिशम अंटार्क्टिकाच्या ज्या हवामान स्टेशनवर काम करत होते ती इमारत 2014 मध्ये तोडण्यात आली. त्यावेळी एका लॉकरच्या मागे त्यांचं हे पाकिट सापडलं. पाकिटात ग्रिशम यांचं नौसेनेतील ओळखपत्र, त्यांच्या ड्रायव्हरचं लायसन्स, एक बियर रेशन पंच कार्ड आणि जैविक किंवा रासायनिक शस्त्र हल्ला झाल्यास काय करावं यासंदर्भातील कार्ड सापडलं.

2014 पासून मालकाला परत देण्याचे सुरू होते प्रयत्न :-
2014 पासून हे पाकिट त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न सुरू होते. पाकिट परत देण्यासाठी अंटार्क्टिकाच्या एका संशोधन गटाच्या प्रमुखांनी त्यांच्या एका माजी कर्मचार्‍याशी संपर्क साधला. या कर्मचाऱ्याने यापूर्वी एका दुकानात विक्री असलेला नेव्ही आयडी ब्रेसलेट ओळखून तो त्याच्या योग्य मालकापर्यंत पोहोचवला होता. डझनभर ई-मेल्स, फेसबुक मेसेज, लेटेर्स पाठवल्यानंतर अखेर शनिवारी ग्रिशम यांना त्यांचं पाकिट पुन्हा भेटलं. इतक्या वर्षांनी त्यांना पाकिटाचा विसरही पडला होता. पण इतक्या वर्षांनी ते पुन्हा त्यांच्यापर्यंत पाठवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या व त्यांना पाठवणाऱ्यांचे आभार मानले.