स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी करोना कालावध्येही सावरकरांचे विचार कशापद्धतीने आजही लागू पडतात अशा आशयाची एक पोस्ट शेअर केली आहे. सोशल नेटवर्किंगवर आज सकाळपासूनच सावरकरांबद्दल अनेक मान्यवरांनी वेगवेगळया पोस्ट शेअर करत त्यांच्या विचारांना आणि आठवणींना उजाळा दिला असला तरी राज यांनी केलेली पोस्ट ही सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.

राज ठाकरेंनी सावरकरांचा एक फोटो पोस्ट केला असून त्यावर सावरकरांचा एक विचार लिहिलेला आहे. धर्मग्रंथांवर समाज उभा करण्याचे दिवस आता गेले, समाज उभा करायचा असेल, टिकवायचा असेल तर तो विज्ञानिष्ठ विचारांनीच, हे सावरकरांचे वाक्य या फोटोवर लिहिलेलं असून बाजूलाच जमावसोबत सावरकर चालतानाच फोटो आहे. सावकरांच्या या विचाराच्या खाली, “करोनाने सगळ्याच रुढ कल्पना, धारणा उन्मळून टाकलेल्या असताना, त्या धारणांना-रूढींना तपासून बघण्याची प्रेरणा देणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवविर्माण सेनेचं विनम्र अभिवादन!”, असं लिहिण्यात आलेलं आहे.

राज ठाकरे यांच्याप्रमाणेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सावरकरांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केलं आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन, “स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रखर राष्ट्रभक्ती प्रेरणादायी आहे. उत्तम संघटक, साहित्यिक–प्रतिभावंत अशा या भाcरतमातेच्या थोर सुपुत्राला, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन,” असा संदेश मुख्यमंत्र्यांच्या नावाने पोस्ट करण्यात आला आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही सावकरांना आदरांजली अर्पण केली आहे. राऊत यांनी सावरकरांचा उल्लेख भारतरत्न असा केला आहे. “भारत रत्न! वीर विनायक दामोदर सावरकर यांना अभिवादन! वंदे मातरम!”, अशा कॅप्शनसहीत राऊतांनी सावरकरांचा फोटो शेअर केला आहे.

सोशल नेटवर्किंगवर #VeerSavarkar, वीर सावरकर हे हॅशटॅग ट्रेण्ड होत असून नेटकऱ्यांनी फोटो, स्टेटस आणि सावरकरांचे विचार शेअर करत त्यांना आदरांजली अर्पण केलीय.