रागाच्या भरात व्यक्ती काय करेल सांगता येत नाही. त्यातही कोणी चुकीचे आरोप केले आणि ते पटले नाहीत तर व्यक्तीच्या डोक्यात गेलेला राग किती उग्र रुप धारण करु शकतो याचे उदाहरण पाहायला मिळाले. अशीच एक घटना नुकतीच घडल्याचे पाहायला मिळाले. गोव्यात अन्वर राजगुरु नावाच्या व्यक्तीने आपली नवी कोरी आणि ड्रीम बाईक असलेली रॉयल एनफील्ड थंडरबर्ड पेट्रोल टाकून जाळून टाकली. ड्रीम बाईक असल्याने त्याने मार्च २००९ मध्ये खरेदी केली होती. नव्या बाईकच्या आनंदात असतानाच एका गोष्टीचा राग आल्याने त्याने ती थेट भर रस्त्यात पेटवून दिली. आता अशा कोणत्या गोष्टीचा राग आला की त्याने ही कृती केली?

तर त्याने ही बाईक खरेदी करण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर केला असा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. या आरोपांमुळे त्याने घेतलेली नवीन बाईक कोर्टाने जप्त केली. त्याचे आयडीकार्ड बनावट असल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला होता. ही केस ७ वर्षे सुरु राहील्याने त्याला आपली बाईक ७ वर्षांनी परत मिळाली. गोवा पोलिस आणि परिवहन विभागाने उशीर केल्याने ही बाईक मिळायला वेळ लागल्याचे त्याने म्हटले. ही बाईक त्याला परत मिळाली तेव्हा त्याला ५ वर्षांची विमा पॉलिसी आणि आरटीओची पेनल्टी भरावी लागली. मात्र इतक्या वर्षांनी ही बाईक मिळाल्य़ाचा आनंद होण्यापेक्षा मनस्तापच जास्त झाल्याने त्याची खूप चिडचिड होत होती. मग जेव्हाही तो आपली बाईक पाहायचा तेव्हा त्याला राग अनावर व्हायचा. याच रागातून त्याने आपल्या बाईकवर पेट्रोल टाकून ती जाळली. कोर्टाच्या समोर त्याने ही आग लावली. आपल्या पार्क केलेल्या बाईकपाशी तो स्कूटीवरुन आला आणि त्याने आग लावली. मग ही आग भडकल्याने अग्निशामक दलाने ती विझवली. आपण अजून कोणाला त्रास देऊ इच्छित नसल्याने आपण बाईक पेटवण्याचा निर्णय घेतल्याचे तो म्हणाला.