करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी सध्या जगभरातील बहुतांश देशांमध्ये लॉकडाउन सुरु आहे. भारतामध्येही लॉकडाउनचा चौथा टप्पा ३१ मे पर्यंत वाढवण्यात आलेला आहे. देशभरातली गंभीर परिस्थिती पाहता, बीसीसीआयने आयपीएलसह आपल्या सर्व महत्वाच्या स्पर्धा स्थगित केल्या आहेत. लॉकडाउन काळात भारतीय खेळाडू घरात राहून आपल्या परिवारासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करत आहेत. काही खेळाडू सोशल मीडियावर एकमेकांशी गप्पा मारत क्रिकेटचा माहोल कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.

भारतीय कसोटी संघाचा फिरकीपटू रविचंद्रन आश्विनने टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्माशी नुकत्याच सोशल मीडियावर गप्पा मारल्या. या गप्पांचा शेवट करताना आश्विनने रोहितला मला मराठी शिकव ना अशी विनंती केली. Stay Home, Stay Safe हे मी मराठीत कसं बोलू असा प्रश्न आश्विनने रोहितला विचारला, ज्यावर रोहितनेही त्याला मराठीतून कसं बोलायचं हे सांगितलं. पाहा हा व्हिडीओ…

करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआयने आयपीएलचा तेरावा हंगामही पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. मात्र ही स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला अंदाजे ४ हजार कोटींचं नुकसान होण्याची शक्यता आहे. यासाठी वर्षाअखेरीस ही स्पर्धा भरवता येते का याची चाचपणी बीसीसीआय करत आहे. आयपीएलमध्ये रोहित मुंबई इंडियन्सकडून तर आश्विन दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळतो.