विवाहनोंदणी संकेतस्थळावर एका ५३ वर्षीय व्यक्तीची एका महिलेशी ओळख झाली. या ओळखीतून त्या दोघांनी लग्नही केले. लग्नाला काही दिवस होत नाहीत तोच या ३६ वर्षीय महिलेने आपल्या पतीच्या घरातून रोख रक्कम आणि सोने घेऊन पळ काढला. यामध्ये ८० हजारांची रक्कम आणि काही तोळ्यांच्या सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. पोलिसांच्या सांगण्यानुसार, विल्लीवक्कम येथे राहणाऱ्या वेंकटरामन यांची पत्नी रामनम्मा घरातून गायब झाल्यानंतर त्यांनी तक्रार केली. तर आपल्याला होमसिकनेस आल्याने आपण आंध्रप्रदेशमधील आपल्या घरी आल्याचे तिने सांगितले.

वेंकटरामन यांनी पोलिसांना सांगितले, सुरुवातीला आपल्या बायकोने चोरलेल्या वस्तूंबाबत आपण तिला काहीही विचारले नाही. पण तिने आपल्याशी बोलणे बंद केल्यानंतर आपण या गोष्टीची दखल घेतल्याचे ते म्हणाले. आपण पैसे आणि सोने याबाबत विचारणा केली असता तिने लगेच आपला मोबाईल स्विच ऑफ केल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे आपण पोलिसात तक्रार नोंदविल्याचे ते म्हणाले. वेंकटरामन यांनी काही वर्षांपूर्वीच आपल्या पहिल्या पत्नीशी १८ वर्षांच्या सोबतीनंतर घटस्फोट घेतला होता. त्यानंतर त्यांनी विवाहनोंदणी संकेतस्थळावर नावनोंदणी केली होती. त्यावेळी रामनम्मा आपण अनाथ असल्याचे सांगत त्यांच्याकडे आल्याचे त्यांनी सांगितले. पोलिस या घटनेची सखोल चौकशी करत आहेत.