आधीच संथगतीने वाटचाल करणाऱ्या अर्थव्यवस्थेला करोनाचा मोठा फटका बसला. भारताचा सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपीचा दर सरलेल्या एप्रिल ते जून तिमाहीत शून्याखाली घसरून २३.९ टक्क्यांनी आक्रसल्याचे, सोमवारी जाहीर झालेल्या आकडेवारीने स्पष्ट केले. ही आकडेवारी समोर आल्यानंतर विरोधकांनी केंद्र सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसपासून ते अन्य पक्षांनाही मोदी सरकारला या आकडेवारीच्या मुद्द्यावरुन धारेवर धरलं आहे. त्यातच मागील काही दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणावरुन चर्चेत असणारे ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनीही मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

प्रशांत भूषण यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन सतीश आचार्य यांनी रेखाटलेले एक व्यंगचित्र शेअर करत मोदी सरकारला टोला लगावला आहे. “डीजीपी २३.९ टक्क्यांनी गडगडला. स्वातंत्र्यानंतरही सर्वात वाईट कामगिरी आहे ही. मात्र कुठेतरी अजूनही, “ये दिल मांगे मोर” (असंच चित्र आहे),” असा टोला प्रशांत भूषण यांनी ट्विटवरुन लागावला आहे. या सोबत प्रशांत भूषण यांनी ट्विट केलेल्या व्यंगचित्रामध्ये मोर जमिनीखाली मान घालून उभा असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या निवासस्थानी येणाऱ्या मोराचे काही व्हिडिओ आणि फोटो आपल्या सोशल नेटवर्किंग अकाउंटवरुन शेअर केले होते. तोच धागा पकडत हे व्यंगचित्र रेखाटण्यात आलं आहे. हेच व्यंगचित्र पोस्ट करत प्रशांत भूषण यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

चितांजनक बाब

तिमाहीगणिक आकडेवारी प्रसिद्ध करण्याच्या १९९६ पासून सुरू झालेल्या प्रघातापासून, नकारात्मक आर्थिक विकासाची ही सर्वात भयाण आकडेवारी असून, एकूणच आशियाई देशांच्या अर्थव्यवस्थांमधील सर्वात वाईट कामगिरीही आहे. अर्थविश्लेषकांनी वर्तविलेल्या पूर्वअंदाजांपेक्षा प्रत्यक्ष अर्थव्यवस्थेची अधोगती मोठी असल्याचे ही आकडेवारी दर्शविते. ही चिंतेची बाब मानली जाते.

अपेक्षा केली जात होती त्याप्रमाणे, केवळ कृषी क्षेत्रात एप्रिल-जून तिमाहीत सकारात्मक वाढ राहिली, असे राष्ट्रीय सांख्यिकी विभागाची (एनएसओ) आकडेवारी दर्शविते. मात्र अर्थव्यवस्थेच्या उत्पादन, बांधकाम आणि सेवा क्षेत्र या इतर अंगांमध्ये कमालीचा उतार दिसला आहे. करोना प्रतिबंध म्हणून २५ मार्च २०२० पासून सुरू झालेल्या देशव्यापी टाळेबंदीने व्यापार-उदिमासह, सामान्य जनजीवनावर साधलेल्या विपरीत परिणामाचेच प्रतिबिंब अर्थव्यवस्थेतील या भीषण उतारात प्रतिबिंबित झाले आहे, अशी ‘एनएसओ’ची स्पष्टोक्ती आहे.

देशाचे सकल राष्ट्रीय उत्पादन (२०११-१२ च्या स्थिर किमतीनुसार) २०२०-२१ आर्थिक वर्षांच्या प्रथम तिमाहीत २६.९० लाख कोटी रुपये अंदाजण्यात आले आहे, जे २०१९-२० च्या प्रथम तिमाहीत ३५.३५ लाख कोटी रुपये होते. म्हणजे २०१९-२० च्या पहिल्या तिमाहीत दिसलेल्या ५.२ टक्क्यांच्या वाढीच्या तुलनेत ते २३.९ टक्क्यांनी आकुंचन पावले आहे, असे ‘एनएसओ’ने दिलेल्या निवेदनातून स्पष्ट केले आहे.

करोनाच्या प्रादुर्भावापूर्वीही म्हणजे जानेवारी ते मार्च २०२० तिमाहीत अर्थव्यवस्थावाढीचा दर हा आठ वर्षांच्या नीचांकाला म्हणजे ३.१ टक्के नोंदविला गेला होता, तर मागील वर्षांत एप्रिल ते जून २०१९ तिमाहीत जीडीपीवाढीचा दर ५.२ टक्के असा होता.