सोशल नेटवर्किंगवर अनेकजण काय कमेंट करतील सांगता येत नाही. त्यातही लोकप्रिय व्यक्तींच्या पोस्टवर अनेकजण नको त्या कमेंट करतात. बहुतांश वेळा अशा कमेंट मस्करीचा विषय ठरतात. मात्र कधीतरी या कमेंटला उत्तरही येते आणि ती कमेंट नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय होते. अशीच चर्चा सध्या नेटवर सुरु आहे मोदींच्या एका ट्विटवर आलेल्या कमेंटची. मला माझ्या प्रेयसीला प्रपोज करायचे असून त्यासाठी हॅलिकॉप्टर पाठवा अशी कमेंट एकाने मोदींच्या एका ट्विटवर केली. या कमेंटला चक्क एका भाजपा नेत्याचे उत्तर दिले आहे.

झालं असं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ६ जून रोजी राजयोगीनी सरला यांच्या निधनासंदर्भात श्रद्धांजली अर्पण करताना एक फोटो ट्विट केला. या ट्विटवर ज्योयकांती दंडपत नावाच्या एका ट्विटर युझरने कमेंट केली. या कमेंटमध्ये त्याने मोदींकडे हेलिकॉप्टरची मागणी केली. ‘मला माझ्या प्रेयसीला लग्नासाठी मागणी घालायची आहे त्यासाठी मला हेलिकॉप्टर द्या’ असं ट्विट या व्यक्तीने केले होते. ओडिसामध्ये राहणाऱ्या या युझरच्या कमेंटला मोदींनी उत्तर देण्याऐवजी भाजपाचे माजी खासदार आणि प्रवक्ते बैजंत जय पांडा यांनी उत्तर दिले.

पांडा यांनी या युझरला प्रेयसीला लग्नाची मागणी घालण्यासाठी हेलिकॉप्टरने न जाण्याचा सल्ला दिला. तसेच हेलिकॉप्टरने न गेल्यास काय फायदा होईल हे ही पांडा यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितले. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘तुम्ही अनेकदा हेलिकॉप्टरची मागणी करणारे ट्विट केली आहे. मात्र तुम्ही लग्नाची मागणी घालण्यासाठी हेलिकॉप्टर घेऊन जाऊ नये. असे केल्यास ती तुमच्या मागणीला उत्तर देताना इतर गोष्टींने प्रभावित होऊन उत्तर न देता खरेखुरे उत्तर देईल.’ इतक्यावरच न थांबता पांडा यांनी या व्यक्तीला टोमणाही लगावला आहे. ‘तुमची टाइमलाइन पाहता तुम्ही अनेक अविवाहित तरुणांकडे तुमचे प्रेम व्यक्त केल्याचे दिसत आहे,’ असंही पांडा या ट्विटमध्ये म्हणाले आहेत. पांडा इतक्यावरच थांबले नाही त्यांनी ज्योयकांती दंडपत याला एक ऑफरही दिली. ‘जर ती हो बोलली तर मी स्वत: तुला लग्न मंडपामध्ये हेलिकॉप्टरने घेऊन जाईन,’ असं आश्वासनही पांडा यांनी ट्विटमधून या युझरला दिले आहे.

दरम्यान बैजंत जय पांडा हे स्वत: एक प्रोफेशनल पायलट असून त्यांच्या ट्विटरवरील बायोप्रमाणे त्यांना १ हजार ७७३ तासांच्या उड्डाणाचा अनुभव आहे.