ट्विटरवर युट्यूब आणि टिकटॉकच्या फॅन्समध्ये काही दिवसांपासून एक वेगळीच ‘लढाई’ सुरूये. युट्यूब आणि टिकटॉकमध्ये सर्वोत्तम कोण याबाबत वाद सुरू आहे, आणि आता याचा फटका शॉर्ट व्हिडिओ मेकिंग प्लॅटफॉर्म TikTok ला बसलाय.

प्ले स्टोअरवर TikTok च्या युजर्स रेटिंगमध्ये अचानक घट झालीये. काही दिवसांपूर्वी प्ले स्टोअरवर TikTok ची रेटिंग 4.7 होती. पण, आता ही रेटिंग कमी होऊन फक्त 2.0 झालीये. गुगल प्ले स्टोअरवर TikTok च्या अधिकृत अ‍ॅपला जवळपास दोन कोटीपेक्षा अधिक युजर्सनी रेटिंग दिले असून यामध्ये बहुतांश युजर्सनी 1 स्टार दिलाय. तर, TikTok च्या दुसऱ्या TikTok Lite या अ‍ॅपचीही सध्याची रेटिंग केवळ 1.1  झालीये.

काय आहे वाद? :-
टिकटॉकची रेटिंग अचानक कमी होण्याचं कारण आहे, ‘व्हर्चुअल वर्ल्ड’मध्ये सुरू असलेला Youtube vs TikTok हा ट्रेंड. टिकटॉकचे युजर्स युट्यूबच्या व्हिडिओंची आणि युट्यूब युजर्स टिकटॉकच्या व्हिडिओंची नेहमी खिल्ली उडवतात. पण, काही दिवसांपूर्वी टिकटॉक स्टार आमिर सिद्दीकी याच्या एका व्हिडिओनंतर हा वाद चिघळला. त्याने युट्यूबर्सची खिल्ली उडवल्यानंतर युट्यूब युजर्स संतापले आणि त्यांनीही टिकटॉकच्या व्हिडिओंची टर उडवण्यास सुरूवात केली. अशातच भारतातील आघाडीच्या युट्यूबर्सपैकी एक असलेल्या ‘कॅरीमिनाटी’ याने Youtube vs TikTok: The End नावाचा एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये त्याने टिकटॉक व्हिडिओ बनवणाऱ्यांची जबरदस्त टिंगल उडवली. काही तासांमध्येच हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आणि सर्वाधिक लाइक मिळालेल्या भारतीय व्हिडिओंमध्ये त्याचा समावेश झाला. पण, लगेच युट्यूबने कम्युनिटी गाइडलाइन्सचं उल्लंघन होत असल्याचं म्हणत हा व्हिडिओ हटवला. टिकटॉक युजर्सनी केलेल्या तक्रारीमुळे (व्हिडिओ रिपोर्ट केल्यामुळे) हा व्हिडिओ हटवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर आता युट्यूब युजर्स चांगलेच चिडले असून अचानक टिकटॉकला निगेटिव्ह रिव्ह्यू आणि रेटिंग दिले जात आहेत. याशिवाय #BanTikTokInIndia  हा हॅशटॅग ट्रेंड होत असून टिकटॉकला बॅन करण्याचीही मागणी होत आहे.