LinkedIn Post, 12 Reasons why you should always leave the office on time: लिंक्डइन या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उद्योजक, कंपन्यांचे संस्थापक आणि कर्मतारी सातत्याने त्यांच्या कामाचे आणि कार्यालयात त्यांना आलेले अनुभव शेअर करत असतात. यामध्ये बरे-वाईट आणि नव्या गोष्टी शिकवणारे अनुभवही असतात. आता लंडनमधील एका उद्योजकाने ऑफिसमधून वेळेवर निघण्याचे महत्त्व सांगणारी लिंक्डइन पोस्ट केली आहे, ज्या सध्या जगभरात चर्चा होत आहे.

आपल्या पोस्टमध्ये डॅन मरे नावाच्या एका उद्योजकाने म्हटले आहे की, “काम ही कधीही न संपणारी प्रक्रिया आहे आणि तुमचा वेळ मौल्यवान आहे.” नोकऱ्यांचे महत्त्व मान्य करताना, त्यांनी यावर भर दिला की, काम किंवा नोकरी आपली एकमेव ओळख बनू नये किंवा ती आपले आरोग्य, आनंद आणि नातेसंबंधांच्या आड येऊ नये.

या पोस्टमध्ये डॅन मरे यांनी निदर्शनास आणून दिले की, जास्त तास केलेल्या कामाची उत्पादकता क्वचितच उच्च असते. याचबरोबर संशोधनातून असे दिसून आले आहे की, आठ तासांच्या कामानंतर कार्यक्षमता झपाट्याने कमी होते.

मरे यांनी पोस्टमध्ये असेही स्पष्ट केले आहे की, वेळेवर काम थांबवणे म्हणजे जबाबदारी टाळणे असे नाही. ऊर्जा, नातेसंबंध आणि संतुलन जपण्यासाठी वेळेत काम थांबवणे महत्त्वाचे आहे. वेळेत काम थांबवून ऑफिसमधून बाहेर पडल्यामुळे नवी उर्जा निर्माण होते, छंद जोपासता येतात आणि आपल्या प्रियजनांसोबत उत्तम वेळ घालवण्यासाठी वेळ मिळतो.

डॅन मरे यांनी आपल्या पोस्टच्या शेवटी म्हटले आहे की, “स्वतःची काळजी घेणे सर्वांसाठी फायदेशीर ठरते. जेव्हा तुम्ही कामाव्यतिरिक्त स्वतःची काळजी घेता तेव्हा तुम्ही तुमच्या टीममध्ये एक चांगले योगदान देणारे व्हाल. कामासाठी तुमच्या वैय्यक्तिक आयुष्याचा त्याग करू नका.”

12 Reasons why you should always leave the office on time
डॅन मरे यांची व्हायरल झालेली लिंक्डइन पोस्ट. (Dan Murray/LinkedIn)

डॅन मरे यांची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यावर युजर्सनीही मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या आहे. एक युजर म्हणाला की, “ऑफिसमधून वेळेवर जाणे म्हणजे कमी काम करणे नाही, तर ते अधिक जगणे आहे. चांगली विश्रांती घेतल्यास तुम्ही जास्त वेळ काम करणाऱ्यापेक्षा उच्च दर्जाचे काम करू शकता.”

दुसऱ्या एका युजरने लिहिले, “मला ही पोस्ट खूप आवडली! काम हे मॅरेथॉन आहे, धावणे नाही याची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. आपले आरोग्य आणि आनंद त्यावरच अवलंबून आहे.”

तिसऱ्या युजरने म्हटले की, “हे मला खूप आवडले. जास्त वेळ काम करणे हे अनेकदा कामाला उत्तम बनवणारे गुण नष्ट करतात. मर्यादा, विश्रांती आणि ऑफिसबाहेरील जीवनासाठी वेळ दिल्याने लोक उत्साही आणि सर्जनशील होतात.”