Aditya Bramhane Bal Puraskar: महाराष्ट्राच्या आदित्य विजय ब्राह्मणे याचा या वर्षीच्या प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी देशभरातून निवड झालेल्या १९ मुलांमध्ये समावेश आहे. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, नावीन्यपूर्ण कार्य, शैक्षणिक कामगिरी, क्रीडा, कला व संस्कृती, समाजसेवा आणि शौर्य या श्रेणींमध्ये दिले जाणारे पुरस्कार सोमवारी विज्ञान भवनात आयोजित समारंभात भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान केले गेले. यावर्षी, शौर्य, विज्ञान- तंत्रज्ञान आणि नवोपक्रम या श्रेणींमध्ये प्रत्येकी एकाला पुरस्कार घोषित झाला आहे. समाजसेवेच्या श्रेणीत चार मुले, क्रीडा प्रकारात पाच मुले आणि कला आणि संस्कृती श्रेणीत सात मुलांना गौरवण्यात आले आहे. आदित्य ब्राह्मणे याला त्याने केलेल्या शौर्यासाठी मरणोत्तर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.

आदित्य हा महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील रहिवासी होता ज्याने १२ व्या वर्षी आपल्या दोन भावंडांना बुडण्यापासून वाचवण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावली होती. तो आणि त्याचे दोन चुलत भाऊ नदीच्या काठापाशी खेळत असताना त्याचे भाऊ पाण्यात बुडू लागले. भावांना वाचवण्यासाठी त्याने खोल पाण्यात उडी मारली. त्याने दोन्ही भावांना जरी वाचवले असले तरी तो पाण्यात इतका खोल गेला की त्याला शोधणे कठीण झाले. आपल्या प्राणांचे बलिदान देऊन भावांचा जीव वाचवल्याने आदित्यला हा मरणोत्तर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

दुसरीकडे, छत्तीसगढमधील बिलासपूर जिल्ह्यातील ६ वर्षीय अरमान उभ्रानीला गणित आणि विज्ञान क्षेत्रातील अपवादात्मक कामगिरी, तसेच कला आणि संस्कृती श्रेणी अंतर्गत पुरस्कार देण्यात आला आहे. अरमान हा ऑनलाईन गुगल बॉय, गुगल मॅथ बॉय आणि वंडर बॉय म्हणुन प्रसिद्ध आहे.


याशिवाय, दिल्लीतील १६ वर्षीय सुहानी चौहान हिने साकारलेला ‘SO-APT’ उपक्रमाला सुद्धा पुरस्कार प्राप्त झाला आहे. यात शून्य कार्बन उत्सर्जन करून शेतकऱ्यांसाठी सौरऊर्जेवर चालणारे कृषी वाहन विकसित करण्याची कल्पना मांडण्यात आली असुन, त्याची नाविन्यपूर्ण कामगिरीच्या श्रेणीत पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. हे सौरऊर्जेवर चालणारे वाहन बियाणे पेरणे, शेतात सिंचन करणे आणि इतर कृषी कार्ये करू शकते.

हे ही वाचा << जगातील सर्वात हुशार विद्यार्थ्यांच्या यादीत भारतीय वंशाच्या ‘प्रीशा’चा समावेश; ९० देशांतील मुलांनी दिली होती परीक्षा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हरियाणातील ७ वर्षीय दृष्टिहीन कन्या गरिमा, हिला तिच्या ‘साक्षर पाठशाळा’ या उपक्रमाद्वारे वंचित मुलांना शिक्षण देण्यासाठी सामाजिक सेवा श्रेणी अंतर्गत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. “या उपक्रमाद्वारे तिने शंभरहून अधिक कार्यक्रमांमध्ये हजाराहून अधिक मुलांशी संपर्क साधला आहे. मुलांना शिक्षित करण्याच्या तिच्या अपवादात्मक प्रयत्नांमुळे अनेक सरकारी अधिकार्‍यांकडून खूप कौतुक झाले आहे.” असे मंत्रालयाने म्हटले आहे. याशिवाय, उत्तर प्रदेशातील दिव्यांग बॅडमिंटनपटू १२ वर्षीय आदित्यची आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिपसह विविध स्पर्धा जिंकण्यासाठी क्रीडा प्रकारांतर्गत निवड करण्यात आली आहे.