लहान मुलांनी चोरी करण्याचा प्रयत्न केलाच तर ते फार फार तर काय चोरतील एखादं खेळणं, चॉकलेट किंवा अशाच छोट्या मोठ्या वस्तू. पण चीनमधल्या १२ वर्षांच्या मुलाने चक्क बस चोरण्याचं धाडस केलंय. या लहान मुलाने बस आगरात असलेली बस दहा किलोमीटरपर्यंत चालवत नेली. आता हे ऐकून तुम्हालाही यावर विश्वास ठेवणं कठीण जात असलं तरी हे खरं आहे. या मुलाला रस्त्यावर बस चालवताना पाहून अनेकांचा यावर विश्वासच बसत नव्हता पण त्याने चीनच्या रस्त्यावर चक्क ४० मिनिटांपर्यंत बस चालवत अनेकांना घाबरवून सोडलं.

वाचा : बाहेरगावी जाताय? मग मुंबईच्या तरुणीला आलेला अनुभव नक्की वाचा!

कोणाचंही लक्ष नसताना तो आगारात उभ्या असलेल्या बसमध्ये चढला आणि त्याने गाडी चालवत नेली. सुदैवानं त्याच्या हातून कोणताही अपघात घडला नाही. रस्त्यावर स्कूल बस विचित्र पद्धतीने धावत असल्याचे लक्षात येताच काही सजक नागरिकांनी पोलिसांना तातडीने याची माहिती दिली. निरखून पाहिल्यावर ही बस एक लहान मुलगा चालवत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याचा बसवरचा ताबा सुटला तर अपघात होईल अशी भीती लोकांना होतीच पण सुदैवाने असे काहीच घडले नाही. या बसमध्ये असलेल्या जीपीएस सिस्टममुळे पोलिसांना या मुलांपर्यंत पोहोचता आले. या मुलाला पोलिसांनी लगेच ताब्यात घेतले. पण त्याचं वय पाहता त्याच्यावर कोणतीही कारवाई पोलिसांनी केली नाही. ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’च्या बातमीनुसार या मुलाने आधीही चोरी करण्याचा प्रयत्न केला होता.

वाचा : पदवीधर तरुणाची सामाजिक बांधिलकी!; गर्भवती महिलांसाठी मोफत रिक्षा सेवा सुरू