एका मोबाईल अॅपमुळे २६० बेपत्ता मुलांचा शोध लागला आहे, अशी माहिती चिनच्या सुरक्षा मंत्रालयाने दिली आहे. चिनमध्ये मुलांचे अपहरण होण्याचे प्रमाण अधिक आहे. चिनच्या सरकारी आकडेवारीनुसार देशातील २ लाखांहून अधिक लहान मुले दरवर्षी  बेपत्ता होतात. किडनी आणि सेक्स रॅकेटसाठी या मुलांचे अपहरण केले जाते. या मुलांचा शोध घेण्यासाठी चिनी सरकारने ‘Tuanyuan’ हे मोबाईल अॅप लाँच केले होते आणि या अॅपच्या मदतीने गेल्यावर्षभरात २५० बेपत्ता मुलांचा शोध लागला असल्याची माहिती चिनच्या सुरक्षा विभागाने दिली आहे. २०१५ मध्ये ‘Tuanyuan’ हे अॅप लाँच करण्यात आले. या अॅपवर आतापर्यंत २८० बेपत्ता मुलांच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यातल्या २६० जणांचा शोध घेण्यात यश आले आहे. सापडलेल्या २६० पैकी १८ मुलांची तस्करी करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी बेपत्ता मुलांचा शोध घेण्यासाठी चिनच्या ‘किंगडाओ’ खाद्य कंपनी आणि ‘Baobeihuijia.com’ ने पाण्याच्या बाटल्यांवर मुलांचे फोटो छापले होते. अनेक सार्वजनिक ठिकाणी या बाटल्याचे वितरण करण्यात आले होते. बेपत्ता झालेल्या मुलांचे फोटो त्यांची माहिती छापलेल्या ५ लाख बाटल्याचे वितरण या दोघांनी मिळून केले होते.