बहिण आपल्या चार वर्षांच्या छोट्या भावाला धीर देत असतानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकजण हा फोटो पाहून भावूक होत आहेत. हा फोटो मुलांची आई कॅटलिन यांनी शेअर केला आहे. लहान वयात होणाऱ्या कॅन्सरमुळे संपूर्ण कुटुंबावर कशा पद्धतीने प्रभाव पडतो यासंबंधी पोस्ट शेअर करत त्यांना हा फोटोदेखील सोबत जोडला आहे. कॅटलिन अमेरिकेतील टेक्सास शहरात वास्तव्यास आहेत.
फोटोमध्ये पाच वर्षांची ऑब्रे आपल्या चार वर्षांच्या कॅन्सरग्रस्त भावाला धीर देताना दिसत आहे. बेकेटला कॅन्सर झाला यामुळे लहानपणीच त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. यामुळे बहिण-भाऊ नेहमीच घरात थांबत असून त्यांना आधीप्रमाणे खेळण्यासही वेळ मिळत नाही. केमोथेरपीमुळे बेकेटला असह्य वेदना सहन कराव्या लागत असून संपूर्ण कुटुंबाचा वेळ त्याची काळजी घेण्यात जात आहे.
फॉक्स न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, बेकेटला २०१८ मध्ये एक्यूट लिम्फोब्लास्टिक ल्यूकेमिया झाल्याचं निदान झालं आहे. यामध्ये पांढऱ्या पेशींवर परिणाम होतो. बेकेटवर रुग्णालयात उपचार करण्यात आले. एक महिना रुग्णालयात घालवल्यानंतर बेकेट घरी परतला. कॅटलिन यांनी फेसबुकवर एक भावूक पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की, एक गोष्ट तुम्हाला सांगितली जात नाही ती म्हणजे लहान मुलांना झालेल्या कॅन्सरचा परिणाम सर्व कुटुंबावर होतो.
“माझी दोन्ही मुलं शाळेत, घऱात खेळण्यापासून ते आता घरातील रुग्णालयात बंदिस्त झाली आहेत”, असंही त्यांनी लिहिलं आहे. यावेळी त्यांनी आपल्या मुलीने कशापद्धतीने भावाला एका चैतन्यशील, उत्साही मुलापासून ते शांत, आजारी मुलगा होताना पाहिलं असल्याचं सांगितलं आहे. याचा परिणाम आपल्या कुटुंबावर कशा पद्धतीने झाला आहे हेदेखील त्यांनी सांगितलं आहे.
ऑब्रे नेहमी आपल्या भावाची काळजी घेते. रात्री झोपण्याआधी त्याचे हात स्वच्छ करते. तसंच बाथरुमदेखील स्वच्छ राहील याची काळजी घेते. दोघांमध्ये अत्यंत घट्ट नात असून या दिवसांमध्ये ते अजून जवळ येत असल्याचं कॅटलिन सांगतात.
कॅटलिन यांच्या पोस्टवर पाच हजाराहून जास्त कमेंट आल्या असून ३४ हजाराहून जास्त शेअर आहेत.