बॅडमिंटन स्टार पी व्ही सिंधूसोबत लग्न करण्यासाठी ७० वर्षांच्या आजोबांनी इच्छा व्यक्त केली आहे. तामिळनाडूमधील रामनाथपूरम जिल्ह्यात हा अजब प्रकार घडला आहे. मलाईस्वामी असं आजोबांचं नाव आहे. मलाईस्वामी यांनी ही इच्छा फक्त बोलून दाखवलेली नाही तर जिल्हाधिकाऱ्यांकडे यासंबंधी याचिका दाखल केली आहे. याचिकेत त्यांनी आपल्याला २४ वर्षीय वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पिअन पी व्ही सिंधूसोबत लग्न करायचं असल्याचं सांगितलं आहे.

मलाईस्वामी यांनी जर लग्नासाठी योग्य तयारी करण्यात आली नाही तर आपण पी व्ही सिंधूचं अपहरण करु आणि लग्न करु अशी धमकीही दिली आहे. जिल्हाधिकारी दर आठवड्याला लोकांची भेट घेत असतात. यावेळी लोक याचिका दाखल करत त्यांच्या समस्या मांडू शकतात. याचवेळी मलाईस्वामी यांनी ही याचिका केली आहे.

मलाईस्वामी यांनी आपला आणि पी व्ही सिंधूचा फोटो एका बंद लिफाफ्यात सादर करत जिल्हाधिकाऱ्यांना आपल्याला पी व्ही सिंधूसोबत लग्न करायचं असल्याचं सांगितलं. इतकंच नाही तर त्यांनी आपला जन्म ४ एप्रिल २००४ रोजी झाला असून आपण फक्त १६ वर्षांचे असल्याचा अजब दावाही यावेळी केला. सिंधूने ज्याप्रकारे आपल्या करिअरमध्ये यशाची उंची गाठली आहे ते पाहून आपण प्रचंड प्रभावित झालो  असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.